Airtel 249 Recharge Plan Closed : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपला लोकप्रिय २४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केला आहे. हा प्लान एअरटेलच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त प्लानपैकी एक होता, जो ग्राहकांना दररोज हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस देत होता. या प्लानच्या बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना त्याच प्रकारच्या सेवेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी रिलायन्स जिओनेही आपला असाच एक स्वस्त प्लान बंद केला होता. आता त्याच मार्गावर एअरटेलनेही पाऊल टाकले आहे.
२४९ च्या प्लानमध्ये काय मिळत होते?
एअरटेल थँक्स ॲपवर आता हा २४९ रुपयांचा प्लान दिसत नाहीये. हा प्लान शोधल्यावर एक अलर्ट मेसेज येत आहे की, 'या प्लानची किंमत आता बदलली आहे.' या जुन्या प्लानमध्ये ग्राहकांना २४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती, ज्यात दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जात होते. हा प्लान ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय होता.
आता २९९ रुपयांचा प्लान घ्यावा लागणार
२४९ रुपयांचा प्लान बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना त्याचसारख्या सेवेसाठी ५० रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. आता २९९ रुपयांचा प्लान एअरटेलचा सर्वात स्वस्त डेटा प्लान बनला आहे, जो ग्राहकांना दररोज डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देतो. जरी या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत असली, तरी पूर्वीच्या प्लानच्या तुलनेत तो महाग झाला आहे.
वाचा - गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
या बदलानंतर आता फक्त व्होडाफोन आयडिया ही एकमेव कंपनी आहे, जी अजूनही २४९ रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. जिओनेही यापूर्वी आपला २४९ रुपयांचा Truly Unlimited प्लान बंद केला होता. या दोन्ही कंपन्यांनी स्वस्त प्लान्स बंद केल्यामुळे आता ग्राहकांना महागड्या प्लान्सचा पर्याय निवडावा लागेल.