Bharti Airtel Bajaj Finance : भारती एअरटेल आणि नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) बजाज फायनान्स यांनी वित्तीय सेवांसाठी भारतातील सर्वात मोठं डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि लास्ट माईल डिलिव्हरीमध्ये बदल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीत एअरटेलचे ३७ कोटींहून अधिक ग्राहक आणि १२ लाखांहून अधिक मजबूत डिस्ट्रिब्युशन नेटवर्कचा समावेश आहे. याशिवाय बजाज फायनान्सच्या २७ प्रॉडक्ट लाइन्स आणि ५,००० हून अधिक शाखा आणि ७० हजार फील्ड एजंट्सचाही यात समावेश आहे.
एअरटेल सुरुवातीला आपल्या एअरटेल थँक्स अॅपवर आणि नंतर स्टोअरच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे बजाज फायनान्सची रिटेल फायनान्शिअल प्रोडक्ट ऑफर करेल. "एअरटेल आणि बजाज फायनान्स ही या देशातील दोन विश्वासार्ह नावं आहेत ज्यांचं उद्दीष्ट लाखो भारतीयांना विविध आर्थिक गरजा असलेल्या पोर्टफोलिओसह सक्षम करणं आहे. दोन्ही कंपन्यांची एकत्रित पोहोच, प्रमाण आणि वितरण शक्ती या भागीदारीचा पाया म्हणून काम करेल आणि आम्हाला बाजारात यशस्वी होण्यास मदत करेल. आम्ही एअरटेल फायनान्सला समूहासाठी धोरणात्मक मालमत्ता म्हणून तयार करत आहोत आणि गुंतवणूक आणि व्यवसाय वाढवत राहू,” अशी प्रतिक्रिया भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी दिली.
गोल्ड लोनपासून पर्सनल लोनपर्यंत मिळणार
मार्चपर्यंत बजाज फायनान्सची चार उत्पादनं एअरटेल थँक्स अॅपवर ग्राहकांना उपलब्ध होतील. यामध्ये गोल्ड लोन, बिझनेस लोन, को-ब्रँडेड इन्स्टा ईएमआय कार्ड आणि पर्सनल लोनचा समावेश आहे. एअरटेल या कॅलेंडर वर्षात बजाज फायनान्सची सुमारे १० आर्थिक उत्पादने लाँच करणार आहे.