Gold Silver Price: सोन्या-चांदीचे दर आज उच्चांकी पातळीवर पोहोचले असून एमसीएक्सपाठोपाठ सराफा बाजारात नवा इतिहास रचला आहे. जीएसटीशिवाय पहिल्यांदाच २४ कॅरेट सोन्याचा भाव ८८,२५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. तर एमसीएक्सवर तो ८८,५०० च्या पुढे गेलाय. कमॉडिटी बाजारात चांदीनं एक लाख रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे.
सराफा बाजारातील ताज्या किमतीनुसार, १८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव सोमवारच्या ८८,१०१ च्या बंद भावापेक्षा १५५ रुपयांनी वाढून ८८,२५६ रुपयांवर उघडला. चांदीचा भावही १६२ रुपयांनी वधारून ९९,९२९ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
२२ आणि १८ कॅरेटचा दर काय?
आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव १५३ रुपयांनी वाढून ८७,९०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १४२ रुपयांनी वधारून ८०,८४८ रुपयांवर खुला झाला. तर १८ कॅरेटचा भाव ११६ रुपयांनी वाढून ६६,१९२ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ९१ रुपयांनी वाढून ५१,६३० रुपये झाला आहे.
मार्चमध्ये आतापर्यंत सोनं ३२०० रुपयांनी तर चांदी ६२८७ रुपयांनी वधारली आहे. २८ फेब्रुवारीला सोन्याचा भाव ८५,०५६ रुपये होता. तर चांदीचा भाव ९३,४८० रुपये आहे. वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत सोनं १२,५१६ रुपयांनी तर चांदी १३,७५० रुपयांनी महागलीये. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.