HP Layoffs: तंत्रज्ञानाचं जग झपाट्यानं बदलत आहे आणि या बदलाची सर्वात मोठी किंमत कर्मचाऱ्यांना मोजावी लागत आहे. एकीकडे कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी (एआय) जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे हजारो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. या संदर्भात, जगप्रसिद्ध कम्प्युटर उत्पादक कंपनी एचपी इंकनं एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी आता २०२८ पर्यंत ४००० ते ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यामागील कारण म्हणजे एआय आधारित प्रणालींचा अवलंब करून कामकाज अधिक जलद, अचूक आणि किफायतशीर बनवणं हे आहे.
कंपनी म्हणते की भविष्यात एआयच्या मदतीनं नवीन उत्पादनं जलद विकसित केली जातील, ग्राहकांच्या मदतीत सुधारणा होईल आणि कामाचा वेगही वाढेल. एचपीचे सीईओ एनरिक लोरेस यांच्या मते, या बदलामुळे पुढील तीन वर्षांत कंपनीची अंदाजे १ अब्ज डॉलर्सची बचत होईल. परंतु, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना नुकसान होईल जे आता एआयमुळे त्यांच्या नोकऱ्या गमावतील.
कंपनीतील दुसरी मोठी कर्मचारी कपात
या वर्षी फेब्रुवारीमध्ये एचपीनं १,००० ते २००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. आता, कंपनीनं पुन्हा एकदा आपल्या रिस्ट्रक्चरिंग योजनेनुसार पुढे जात आहे आणि ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. यावेळी, सर्वात मोठा परिणाम उत्पादन विकास, अंतर्गत ऑपरेशन्स आणि कस्टमर सपोर्ट टीमवर होईल.
एआय पीसीची वाढती मागणी आणि...
एचपीनं रिपोर्ट दिलाय की एआय-अनेबल्ड पर्सनल कम्प्युटरची मागणी वेगानं वाढत आहे आणि चौथ्या तिमाहीत कंपनीच्या एकूण पीसीपैकी ३०% एआय पीसी होते. तथापि, या वाढत्या मागणीचा एक प्रमुख परिणाम म्हणजे मेमरी चिपच्या किमतींमध्ये वाढ. डेटा सेंटरमध्ये एआय पायाभूत सुविधांची उच्च मागणी डीआरएएम आणि नँड चिप्सच्या किमती वाढवत आहे. यामुळे एचपी, डेल आणि एसर सारख्या कंपन्यांच्या नफ्यावर लक्षणीय दबाव येऊ शकतो. एचपी म्हणते की चिपच्या किमतीत वाढ होण्याचा सर्वात मोठा परिणाम २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत जाणवेल. कंपनीनं सध्या पहिल्या सहा महिन्यांसाठी पुरेसा साठा जमा केला आहे, परंतु नंतर खर्च वाढण्याचा गंभीर धोका आहे.
कमकुवत नफ्याच्या गाईडन्समुळे चिंता
कंपनीनं २०२६ साठीचा नफ्याचा अंदाज देखील कमी केला आहे. एचपीला प्रति शेअर कमाई २.९० डॉलर्स आणि ३.२० डॉलर्सच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, जी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामुळे, कंपनीच्या शेअर्समध्ये देखील ५.५% ची घट झाली आहे.
