केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बदल केले आहेत. यासाठी आता आणखी पाच दिवस वाट पहावी लागणार आहे. जवलपास ९० टक्के वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यामुळे सरकारला फटका तर जनतेला फायदा होणार आहे. यावर आता अर्थमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे.
बुधवारी विशाखापटनम येथे आयोजित "नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा" कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी जीएसटीमध्ये झालेल्या बदलांमुळे जनतेच्या हातात जादाचे दोन लाख कोटी रुपये उरणार असल्याचे म्हटले आहे. ९९ टक्के वस्तू, ज्या १२ टक्के जीएसटीमध्ये येत होत्या त्या ५ टक्क्यांवर आणल्या आहेत. याचा फायदा मध्यमवर्गालाच नाही तर गरीबांनाही होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
२०१७ मध्ये लागू झालेल्या 'एक राष्ट्र, एक कर' उपक्रमानंतर जीएसटी सुधारणा हा सर्वात मोठा बदल आहे. १२% आणि २८% दर रद्द करण्यात आले आहेत. बहुतेक दैनंदिन अन्न आणि किराणा मालावर आता ५% दराने कर आकारला जाईल, तर दूध, ब्रेड आणि चीज यासारख्या आवश्यक वस्तूंना सूट दिली जाईल. यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि सामान्य माणसाचे जीवन सोपे होईल, असे सीतारामन यांनी सांगितले.
देशातील जीएसटी करदात्यांची संख्या ६.५ दशलक्ष वरून १५.१ दशलक्ष झाली आहे. जीएसटी महसूल २०१८ मध्ये ७.१९ लाख कोटी रुपये होता, तो २०२५ मध्ये २२.०८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणार असा अंदाज आहे. जीएसटी कपातीला लाभ हा केवळ कंपन्यांना नाही तर सामान्यांना देखील मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी केल्याने त्यांची खरेदी शक्ती वाढेल आणि त्यांना अधिक खर्च करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
