अदानी समूहाने नुकतेच जवळपास 275 मिलियन डॉलर (अंदाजे 2400 कोटी रुपये) एढे कर्ज घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, हे कर्ज परकीय चलनात घेण्यात आले आहे. यावरून, अदानी समूह अजूनही कर्ज घेण्यास सक्रिय असल्याचे दिसते. यासंदर्भात माहिती असलेल्या लोकांनी हे सांगितले आहे.
ब्लूमबर्गनुसार, अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने 150 मिलियन डॉलर एवढे कर्ज घेतले आहे. हे कर्ज अनेक बँकांकडून घेण्यात आले आहे. या बँकांमध्ये बार्कलेज पीएलसी, डीबीएस बँक लिमिटेड, फर्स्ट अबू धाबी बँक आणि मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुपचा समावेश आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या शिवाय, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडनेही 125 मिलियन डॉलरचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुपसह एका द्विपक्षीय करारांतर्गत घेण्यात आले आहे.
किती व्याज लागणार? -
विमानतळासाठी घेतलेल्या कर्जावर सिक्युअर्ड ओव्हरनाईट फायनान्सिंग रेट (SOFR) पेक्षा सुमारे 300 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज आकारले जाणार आहे. तर बंदरांसाठी घेतलेल्या कर्जावर SOFR पेक्षा 215 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज आकारले जाईल. SOFR हा एक बेंचमार्क व्याजदर आहे. दोन्ही कर्जे चार वर्षांसाठी आहेत. यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर डॉलर बॉन्ड्स परत खरेदी करण्यासाठी आणि भांडवली खर्चासाठी केला जाईल.
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतोय -
गुंतवणूकदारांचा अदानी समूहावरील विश्वास वाढत आहे. यामुळेच ते अदानी समूहाला कर्ज देण्यास तयार आहेत. अदानी समूह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी विविध मार्गांनी निधी उभारत आहे. गेल्या सहा महिन्यांत, अदानी समूहाने १० अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक कर्ज घेतले आहे. हे त्यांच्या एकूण कर्जाच्या सुमारे एक तृतीयांश एवढे आहे.