Adani Sahara Group Properties: भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी एक मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत आहेत. इंडिया टुडेच्या एका अहवालानुसार, अदानी समूह अडचणीत सापडलेल्या सहारा समूहाच्या अनेक मालमत्ता विकत घेण्याची तयारी करत आहे.
या मालमत्तांमध्ये महाराष्ट्रातील अँबी व्हॅली (Aamby Valley), लखनौ येथील सहारा शहर आणि मुंबईतील सहारा स्टार हॉटेल यांचा समावेश आहे. अदानी समूह सहारा समूहाच्या ८८ मालमत्ता खरेदी करू शकतो आणि हा भारतातील सर्वात मोठा प्रॉपर्टी करार ठरू शकतो. अहवालात दोन कायदेशीर सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे.
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
'क्राऊन ज्वेल्स' खरेदीची तयारी
अहवालानुसार, अदानी समूहाची रियल इस्टेट कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड सहारा समूहाच्या अनेक खास मालमत्ता विकत घेण्याची तयारी करत आहे. सूत्रांनुसार, सहारा समूह त्यांच्या मालमत्ता तुकड्यांमध्ये न विकता एकत्रितपणे विकत आहे. यात सहारा समूहाचे 'क्राऊन ज्वेल्स' (Crown Jewels) मानल्या जाणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे.या प्रमुख मालमत्तांमध्ये महाराष्ट्रातील ८८१० एकरमध्ये पसरलेली अँबी व्हॅली सिटी आणि मुंबई विमानतळाजवळ असलेलं सहारा स्टार हॉटेल यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या समूहाच्या मालमत्ता देखील अदानी समूहाला हस्तांतरित केल्या जाऊ शकतात.
प्रॉपर्टी का विकल्या गेल्या नाहीत?
अहवालात असं म्हटलंय की, अदानी समूह सहाराच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकरकमी रक्कम देऊ शकतो. मात्र, हा करार सोपा नाही, कारण सहारा समूहाशी संबंधित अनेक प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. समूहाच्या अनेक कंपन्या बाजार नियामकाच्या (SEBI) तपासणीतून जात आहेत. सहारा समूहाला, सहाराच्या योजनांमध्ये गुंतवलेल्या लाखो गुंतवणूकदारांचे पैसे परत करायचे आहेत. या वादामुळे सहारा समूहाच्या अनेक मालमत्ता अडकल्या होत्या आणि त्या विकणं खूप कठीण झालं होतं.
समूहाशी संबंधित कागदपत्रांनुसार, सहारा समूहाने यापूर्वीही आपल्या मालमत्ता विकण्याचे अनेक प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यश मिळालं नाही. यामागे अनेक कारणं होती. पहिलं कारण म्हणजे बाजारपेठेतील परिस्थिती वाईट होती आणि सहाराला तिच्या मालमत्तेची चांगली किंमत मिळत नव्हती. दुसरं म्हणजे इतकी मोठी मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक असलेला विश्वासार्ह आणि मोठा खरेदीदार त्यांना सापडत नव्हता. तिसरं कारण म्हणजे सहारा समूहावर अनेक खटले सुरू होते.