नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात घसरण झाल्यामुळे सीएनजीचे दर वाढले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील कंपनी अदानी टोटल गॅस लिमिटेडने (Adani Total Gas Ltd.) गुजरातमध्ये सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचा दर 80.34 रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी येथे सीएनजी 79.34 रुपये प्रतिकिलो होता.
सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात गॅसने सीएनजीच्या दरात प्रति किलो 3.5 रुपयांची वाढ केली होती, असे फेडरेशन ऑफ गुजरात पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद ठक्कर यांनी सांगितले. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे आणि ते प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आले आहे.
मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 79.46 डॉलर आणि डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 74.56 डॉलरवर दिसले. गेल्या साडे सात महिन्यांपासून देशांतर्गत तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात शेवटची कपात केली होती. त्यावेळी पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले होते.
दरम्यान, महागाईची वाढती पातळी आणि कच्च्या तेलात वाढ होऊनही गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आरबीआयने घेतलेल्या कडक पावले आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नरमाईमुळे महागाईचा स्तरही खाली आला आहे.
