Free Trade Agreement or FTA : अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताने आता इतर देशांसोबत हात मिळवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांनी ऐतिहासिक 'मुक्त व्यापार करारा'वर वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. मे महिन्यात सुरू झालेली ही चर्चा अवघ्या ७ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, यामुळे दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी या कराराची माहिती दिली.
व्यापारातील 'टॅरिफ वॉल' कोसळणार
या करारामुळे न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या ९५ टक्के उत्पादनांवरील आयात शुल्क एकतर पूर्णपणे रद्द होईल किंवा लक्षणीयरीत्या कमी होईल. पुढील २० वर्षांत न्यूझीलंडची भारताला होणारी निर्यात वार्षिक १.१ अब्ज डॉलर्सवरून १.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या करारामुळे न्यूझीलंडच्या कंपन्यांना भारतातील १४० कोटी ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
सद्यस्थिती आणि व्यापार आकडेवारी
भारत आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार सध्या १.३ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. यामध्ये भारताची निर्यात ७१.११ कोटी डॉलर्स (इंधन, औषधे, कापड, बासमती तांदूळ, दागिने). तर आयात ५८.७१ कोटी डॉलर्स (लाकूड, कोळसा, लोकर, सफरचंद, कीवी फळे) आहे. न्यूझीलंडचे सरासरी आयात शुल्क केवळ २.३% आहे, तर भारताचे १७.८% आहे. या करारा मुळे ही तफावत दूर होईल.
सेवा क्षेत्रातील भागीदारी
केवळ वस्तूच नाही, तर सेवा क्षेत्रातही दोन्ही देशांची पकड मजबूत आहे. भारत आयटी, सॉफ्टवेअर सेवा, दूरसंचार आणि आरोग्य सेवांमध्ये आघाडीवर आहे. तर न्यूझीलंडचा शिक्षण क्षेत्रात मोठा वाटा असून पर्यटन आणि फिनटेक क्षेत्रातही न्यूझीलंडची मोठी गुंतवणूक आहे.
वाचा - 'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
पुढील १५ वर्षांचे 'व्हिजन'
- व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य : येत्या ५ वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा मानस दोन्ही देशांनी व्यक्त केला आहे.
- गुंतवणुकीचा महापूर : पुढील १५ वर्षांत न्यूझीलंड भारतात २० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करेल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला आहे.
- संधींची दारे : हा करार केवळ मोठ्या उद्योगांसाठीच नाही, तर शेतकरी, विद्यार्थी, लघु उद्योजक आणि तरुण संशोधकांसाठी नवीन संधींचे दालन उघडणारा ठरेल.
