नवी दिल्ली : कामातील अनियमितता, नियमभंग आदींचा ठपका ठेवत बँकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडात दुप्पट वाढ केली तरी बँकांविषयी येणाऱ्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. बँका व वित्तीय संस्थांविरुद्धच्या ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी वाढत आहेत. २०२३-२४ मध्ये बँकाविषयी ग्राहकांकडून ९.३४ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
२०२२-२३ च्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण ३२.८ टक्के अधिक असल्याचे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी सर्वाधिक ८५,२८१ तक्रारी केल्या आहेत. २०२२-२३ मध्ये या तक्रारींची संख्या ५९,७६२ इतकी होती. एटीएम-डेबिट कार्डसंदर्भातील तक्रारी २९,९२५ वरून २५,२३१ पर्यंत घटल्या आहेत.
तक्रारी किती वाढल्या?
विषय २०२३-२०२४ २०२२-२३
कर्ज ८५,२८१ ५९,७६२
बँकिंग ५७,२४२ ४३,१६७
खाते ४६,३५८ ३४,४८१
क्रेडिट कार्ड ४२,३९३ ३४,१५१
दंडाची रक्कम दुप्पट
बँकांवर लावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ झाली आहे.२०२३-२४ मध्ये बँकांवर आकारलेल्या दंडीची रक्कम ८६ कोटी रुपये इतकी होती. २०२२-२३ मध्ये बँकांवर ४० कोटींचा दंड आकारण्यात आला.
सोने तारण कर्जांचे पुनरावलोकन करा
गोल्ड लोन देण्यामध्ये आढळलेल्या अनियमितता लक्षात घेता आरबीआयने निगराणी यंत्रणांना अशा कर्जांवरील त्यांच्या धोरणे, प्रक्रिया आणि पद्धतींचे सखोल पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला आहे.
काम सोडण्याचे प्रमाण वाढले
खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरी बदलण्याचा दर २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आगे. यामुळे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि संस्थात्मक नुकसानही झालेले आहे.