लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश व्यावसायिक (प्रोफेशनल) २०२६ मध्ये नवी नोकरी किंवा नवी भूमिका शोधण्याचा विचार करत आहेत, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. अनिश्चितता, कौशल्यातील तफावत आणि वाढती स्पर्धा यांमुळे अनेकजणांना आपल्या उपयुक्तततेबद्दल शंका वाटते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘लिंक्डइन’ने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, ८४ टक्के व्यावसायिकांना वाटते की, नवी नोकरी शोधण्यासाठी आपण पुरेसे सुसज्ज नाही आहोत. भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, झपाट्याने बदलणाऱ्या कौशल्यविषयक गरजा आणि स्पर्धात्मक नोकरी बाजार यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
लिंक्डइनच्या आकडेवारीनुसार, २०२२ पासून रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे स्पर्धा तीव्र झाली आहे.
योग्य उमेदवार शोधणे अधिक कठीण
- ७४ टक्के एचआरला योग्य उमेदवार शोधणे कठीण झाले आहे.
- लिंक्डइनच्या करिअर तज्ज्ञ निराजिता बॅनर्जी यांनी सांगितले की, एआयचा योग्य वापर केल्यास कौशल्ये ओळखणे, तयारी करणे आणि योग्य संधी मिळवणे सोपे होऊ शकते.
- १८ ते ७९ वयोगटातील १९,११३ लोकांचा आणि ६,५५४ एचआर तज्ज्ञांचा सहभाग असलेले हे सर्वेक्षण नोव्हेंबर २०२५ मध्ये करण्यात आले.
