व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे. हा साठा सौदी अरेबिया आणि इराणसारख्या देशांपेक्षाही अधिक आहे. तसंच, जगात सर्वात स्वस्त पेट्रोल विकण्याच्या बाबतीत व्हेनेझुएला तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत ३.१५ रुपये आहे. म्हणजेच भारतात जिथे एक कप चहा १० रुपयांना मिळतो, त्या किमतीत तिथे ३ लिटर पेट्रोल येईल. 'ग्लोबल पेट्रोल प्राइसेज डॉट कॉम'च्या ताज्या आकडेवारीनुसार, यापेक्षा स्वस्त पेट्रोल केवळ इराण (२.५७ रुपये) आणि लिबिया (२.४९ रुपये) मध्ये आहे.
अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशननुसार (EIA), व्हेनेझुएलाकडे ३०३ अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा प्रचंड साठा आहे, जो जगातील एकूण साठ्याच्या सुमारे पाचवा भाग आहे. व्हेनेझुएलाच्या 'ओरिनोको बेल्ट' भागात बहुतेक तेल साठा असून तो ५५,००० चौरस किमी क्षेत्रात पसरलेला आहे.
डिझेल बनवण्यासाठी सर्वात उपयुक्त
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल हे अतिरिक्त जड आणि 'सोर' (जास्त सल्फर असलेले) असतं, जे डिझेल बनवण्यासाठी सर्वात उपयुक्त मानलं जातं. हे तेल विक्रीयोग्य बनवण्यासाठी त्यात हलकं तेल मिसळावं लागते, ज्यामुळे ते जागतिक पुरवठा साखळीचा एक अनिवार्य भाग बनतं. जगातील अनेक मोठ्या रिफायनरी, जसं की अमेरिकेतील गल्फ कोस्ट आणि भारतातील रिलायन्स/नायरा रिफायनरी, अशा जड तेलावर प्रक्रिया करण्यासाठी खास बनवल्या गेल्या आहेत.
अमेरिकेसाठी का आहे महत्त्वाचे?
मध्यपूर्वेतील देशांच्या तुलनेत व्हेनेझुएला अमेरिकेच्या खूप जवळ आहे. युद्ध किंवा सागरी तणावाच्या परिस्थितीत येथून तेलाचा पुरवठा कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ शकतो.
कोणते देश किती तेल खरेदी करतात?
- भारत: २०२४ मध्ये दररोज सुमारे २.५४ लाख बॅरल तेल (एकूण निर्यातीच्या जवळपास अर्धे) आयात करत होता.
- चीन: एकूण निर्यातीच्या सुमारे ५५% ते ८०% (दररोज सुमारे ७,४६,००० बॅरल).
- इतर देश: रशिया, सिंगापूर, व्हिएतनाम आणि क्युबा हे देखील व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल घेणाऱ्या देशांमध्ये सामील आहेत.
