लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याला यंदा १० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त १०० रुपयांचे एक विशेष नाणे केंद्र सरकार जारी करणार आहे. ही माहिती नामवंत नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी दिली.
लुणावत म्हणाले की, हे १०० रुपयांचे विशेष नाणे कोलकाताच्या टाकसाळीमध्ये तयार करण्यात येईल. या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असून त्यामध्ये ५०% चांदी, ४०% तांबे, ५% जस्त व ५% निकेल यांचे मिश्रण असेल. या नाण्याच्या एका बाजूस मध्यभागी मेक इन इंडियाचे बोधचिन्ह असलेल्या सिंहाची उठावदार प्रतिमा असेल. त्याच्या वरच्या कडेला हिंदीत आणि खालच्या कडेला इंग्रजीत ‘मेक इन इंडिया १०वा वर्धापनदिन’ असा मजकूर असणार आहे. सिंहाच्या चित्राभोवती विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी आणि संगणक तंत्रज्ञान यांचे प्रतिनिधित्व करणारी आठ रंगीत चिन्हे असतील. या सिंहाच्या खाली २०२५ हे वर्ष नमूद केलेले असेल. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभाची प्रतिमा असेल. त्याखाली रुपयाचे प्रतीकचिन्ह आणि १०० हा नाण्याची किंमत दर्शविणारा आकडा असणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना “भारत” आणि “रुपीज” हे शब्द अनुक्रमे हिंदी व इंग्रजीत लिहिलेले असणार आहेत, असे सुधीर लुणावत यांनी सांगितले.
देशाच्या विकासासाठी ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाचे
मेक इन इंडिया हा केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील कंपन्यांना भारतात विविध प्रकल्प सुरू करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
भारतात विदेशी गुंतवणूक अधिकाधिक व्हावी तसेच देशातील अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा, यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात.