नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे गुजरातमधील हिरे उद्योगास मोठा फटका बसला असून १० दिवसांत जवळपास १ लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
गुजरातमधील 'डायमंड वर्कर्स युनियन'चे उपाध्यक्ष भावेश टांक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र भागातील भावनगर, आमरेली आणि जुनागढ येथील छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका बसला आहे. टॅरिफ वाढल्यामुळे अनेकांच्या निर्यात ऑर्डर्स प्रलंबित झाल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत.
कंपन्या उघडपणे बोलेनात
मोठ्या कंपन्या नोकरकपातीबाबत उघडपणे बोलत नाहीत; परंतु उद्योगातील लोक सांगतात की, काही बेरोजगारांना लॅबमध्ये तयार होत असलेल्या डायमंड क्षेत्रात काम मिळत आहे. मात्र, जर या क्षेत्रावरही ५० टक्के टॅरिफ लावले तर अनेकांच्या नोकऱ्या जातील. या क्षेत्रासाठी अमेरिका मुख्य बाजारपेठ आहे. टैरिफ वाढीमुळे उत्पादन घटेल. तात्पुरती नोकरकपात होईल.
...तर कठोर पावले
सध्या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका लहान शहरांना बसला आहे. सुरतस्थित मंगुकिया म्हणाले की, अमेरिकन खरेदीदार आमच्याशी बोलत आहेत. ते भारतातून डायमंड घेऊन व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये ज्वेलरी बनवण्याचा विचार करत आहेत, कारण या देशांवर अमेरिकेचा टॅरिफ कमी आहे. जर काही मार्ग निघाला नाही, तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील.
१० अब्ज डॉलर्स किमतीची रत्न व दागिन्यांची निर्यात भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अमेरिकेला केली.
१० पैकी ९ डायमंड भारतात कटिंग पॉलिशिंग होतात.