Pay with Mutual Fund: आतापर्यंत तुम्ही तुमच्या बँक खात्यातून युपीआय पेमेंट केले असेल, पण आता वेळ बदलणार आहे. भारताच्या पहिल्या म्युच्युअल फंड-आधारित युपीआय ॲप 'Curie Money'नं एक नवीन पे विथ म्युच्युअल फंड (‘Pay with Mutual Fund’) हे फीचर लाँच केलंय. हे तुमचे पैसे खर्च करण्याचे आणि वाढवण्याचे, असे दोन्ही काम एकाच वेळी करेल. या फीचरद्वारे तुम्ही थेट तुमच्या लिक्विड म्युच्युअल फंडातून पेमेंट करू शकता. म्हणजेच, आता तुमचे पैसे बँकेत पडून राहणार नाहीत, तर गुंतवणुकीवर परतावा देखील कमवतील आणि गरज पडल्यास त्वरित खर्चही करता येतील.
हे नवीन फीचर कसं काम करतं?
Curie Money ॲपवर जेव्हा तुम्ही “Scan & Pay” चा पर्याय निवडता, तेव्हा हे ॲप तुमच्या लिक्विड फंडातून पेमेंटसाठी आवश्यक असलेली रक्कम आपोआप रिडीम करते. हे पैसे काही सेकंदांत तुमच्या बँक खात्यात पोहोचतात आणि UPI व्यवहार पूर्ण होतो. याचा अर्थ, जोपर्यंत तुम्ही ते पैसे खर्च करत नाही, तोपर्यंत तुमचे पैसे लिक्विड फंडात वाढत राहतील. “रोजच्या कामाप्रमाणेच, लोकांच्या पैशांची वाढही अगदी स्वाभाविक वाटावी म्हणून आम्ही हे फीचर बनवलं आहे," अशी प्रतिक्रिया Curie Money चे संस्थापक आणि CEO अरिंदम घोष यांनी दिली.
कोणते फंड्स आणि बँका सहभागी?
हे फीचर सध्या ICICI Prudential AMC, Bajaj Finserv AMC आणि Yes Bank च्या भागीदारीत लाँच करण्यात आलं आहे. म्हणजेच, या तिन्ही संस्था सध्या या नवीन तंत्रज्ञानाला सपोर्ट करत आहेत आणि याचा वापर पूर्णपणे सुरक्षित आहे.
हे फीचर इतकं खास का?
त्वरित पैसे - आता तुम्हाला म्युच्युअल फंडमधून आधी पैसे ट्रान्सफर करून बँकेत जमा करण्याची गरज नाही. फक्त स्कॅन करुन तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. हे अगदी फोनवर बोलण्याइतकंच सोपं आहे.
सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त परतावा - जिथे सेव्हिंग अकाउंटमध्ये ३-४% व्याज मिळते, तिथे लिक्विड फंड्स ६-७% पर्यंत परतावा देत आहेत. म्हणजे, आता तुमचे पैसे तसेच पडून राहणार नाहीत.
UPI ची सुविधा, म्युच्युअल फंडाचा फायदा - दैनंदिन लहान-मोठे पेमेंट जसे की शॉपिंग, प्रवास किंवा बिल, आता म्युच्युअल फंडातून देखील होऊ शकतात. तुम्हाला न ॲप बदलावं लागेल, न खातं स्विच करावं लागेल.
व्यवसाय आणि गुंतवणूकदार दोघांसाठी फायदेशीर - जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा शॉर्ट-टर्मसाठी पैसे ठेवू इच्छित असाल, तर हे फीचर कॅश मॅनेजमेंटला स्मार्ट करेल. आता तुमचा पैसा नेहमी गुंतवलेला राहतील आणि गरज पडल्यास त्वरित वापरला जाऊ शकेल.
सामान्य गुंतवणूकदारांना काय फायदा होईल?
या फीचरमुळे लहान गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यांचे पैसे २४x७ काम करतील. जोपर्यंत खर्च करायचे नाहीत, तोपर्यंत गुंतवणूक वाढेल आणि पेमेंटची गरज पडताच, फंड रिडीम होऊन त्वरित वापरला जाईल.
सुरक्षा आणि नियम
Curie Money ची संपूर्ण प्रणाली भारताच्या UPI नेटवर्कवर आधारित आहे आणि ते SEBI च्या नियमांनुसार काम करते. यात सामील असलेल्या सर्व संस्था ICICI Prudential AMC, Bajaj Finserv AMC आणि Yes Bank या नियंत्रित आणि विश्वासार्ह आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
