लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वाढदिवस असो वा सण-समारंभ, आता भेटवस्तू म्हणून कपडे किंवा मिठाई देण्याऐवजी थेट ‘म्युच्युअल फंड गिफ्ट कार्ड’ देऊ शकणार आहात.
बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘गिफ्ट प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट’ (पीपीआय) सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. यामुळे ‘गिफ्ट’च्या माध्यमातून गुंतवणुकीचा नवा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. सेबीने यासंदर्भात पत्र जारी केले असून, १४ एप्रिलपर्यंत सर्वसामान्यांकडून सूचना व आक्षेप मागवले आहेत.
यात एका गुंतवणूकदाराला एका आर्थिक वर्षात गिफ्ट कार्ड, ई-वॉलेट किंवा रोखीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येईल. हे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी केवळ भारतीय बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर (यूपीआय) करणे अनिवार्य असेल.
