Mexico Tarrife : जगभरात व्यापार युद्धाची आग दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अमेरिकेनंतर आता मेक्सिकोने टॅरिफचं हत्यार बाहेर काढलं आहे. याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे. मेक्सिकोने भारत, चीन आणि अनेक आशियाई देशांवर ५०% पर्यंत आयात शुल्क लावण्याची मोठी घोषणा केली आहे. जागतिक पुरवठा साखळी आधीच तणावाखाली असताना आणि प्रत्येक देश आपल्या उद्योगांना वाचवण्यासाठी संरक्षक उपाययोजना करत असताना हा निर्णय आला आहे.
मेक्सिकोचा नेमका निर्णय काय?
मेक्सिकोच्या सिनेटने अशा देशांवर आयात शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली आहे, ज्यांच्यासोबत मेक्सिकोचा कोणताही मुक्त व्यापार करार नाही. या निर्णयाच्या कक्षेत भारत, चीन, कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे देश येतात. १ जानेवारी २०२६ पासून हा निर्णय लागू होणार आहे. यामध्ये ऑटोमोबाईल, स्टील, कापड, प्लास्टिक, पादत्राणे आणि अनेक क्षेत्रांवर ३५% ते ५०% पर्यंत शुल्क लादले जाईल.
मेक्सिकोने का घेतला निर्णय?
मेक्सिकोच्या नवीन सरकारचा युक्तिवाद अनेक बाबींवर आधारित आहे. आशियाई देशांतून येणाऱ्या स्वस्त मालामुळे मेक्सिकोच्या स्थानिक उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी हे शुल्क आवश्यक आहे. या वाढलेल्या टॅरिफमुळे २०२६ मध्ये मेक्सिकोला सुमारे ३.७ अब्ज डॉलरचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
जियोपॉलिटिकल संकेत
तज्ज्ञ या निर्णयाला केवळ आर्थिक नव्हे, तर एक खोल भू-राजकीय संकेत मानत आहेत. अमेरिका सातत्याने मेक्सिकोवर आशियाई मालाचा प्रवाह रोखण्यासाठी दबाव टाकत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा चीन मेक्सिकोच्या मार्गे अमेरिकेच्या बाजारात प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. हे पाऊल उचलून मेक्सिको अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताला किती नुकसान?
भारत आणि मेक्सिको यांच्यातील व्यापार मोठा असून, तो भारताच्या बाजूने झुकलेला आहे. दरवर्षी सुमारे ५.३ अब्ज डॉलर किमतीचा भारतीय माल मेक्सिकोला निर्यात होतो. या निर्यातीमध्ये ऑटोमोबाईल (गाड्या आणि पार्ट्स) चा सर्वात मोठा वाटा आहे. मेक्सिकोने कारवरील टॅरिफ २०% वरून थेट ५०% केल्यामुळे भारतीय ऑटो निर्यातदारांना (उदा. फोक्सवॅगन, ह्युंदाई, मारुती सुझुकी, निसान) सर्वात मोठा झटका बसणार आहे. तसेच स्टील, प्लास्टिक, कापड आणि ॲल्युमिनियम उत्पादनांवरही मोठा नकारात्मक परिणाम होणार आहे.
पुढील वाटचाल
या मोठ्या टॅरिफमुळे भारतीय कंपन्यांना आणि सरकारला त्वरित पाऊले उचलावी लागतील. भारताला आता राजकीय आणि व्यापारी स्तरावर मेक्सिकोसोबत चर्चा करून शुल्कातून सूट मिळवावी लागेल. याशिवाय, भारतीय निर्यातदार कंपन्यांना मेक्सिकोशिवाय नवीन बाजारपेठा शोधून आपल्या निर्यात मॉडेलमध्ये बदल करावा लागेल.
