The market has grown due to international developments | आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे बाजारात झाली वाढ
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे बाजारात झाली वाढ

- प्रसाद गो. जोशी
चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामध्ये काही प्रमाणात आलेली सौम्यता, युरोपीयन बॅँकेने युरोपियन देशांना दिलेले आर्थिक पॅकेज, परकीय वित्तसंस्थांनी केलेली चांगली खरेदी आणि सरकारकडून आर्थिक वृद्धीसाठी काही सवलती मिळण्याची अपेक्षा यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये गतसप्ताह वाढीचा राहिला.
शेअर बाजारात गतसप्ताहाचाही प्रारंभ घसरणीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,९६९.४८ अंशांवर खुला झाला. सप्ताहाच्या अखेरीस ३७,३८४.९९ अंशांवर स्थिरावला. मागील सप्ताहाच्या तुलनेत तो ४०३.२२ अंश (१.०९ टक्के) वाढीव पातळीवर बंद झाला आहे.
राष्टÑीय शेअर बाजारातही वातावरण चांगले होते. येथील निर्देशांकात (निफ्टी) सप्ताहामध्ये १२९.७० अंशांची (१.१८ टक्के) वाढ होऊन तो ११,०७५.९० अंशांवर बंद झाला. सेन्सेक्स,निफ्टीसह सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.
परकीय वित्तीय संस्थांनी गतसप्ताहामध्ये १८४१ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. अमेरिकेने चीनवरील वाढीव कर लावणे पुढे ढकलल्याने, या दोेन देशांमधील व्यापारयुद्ध काहीसे सौम्य झाले आहे. युरोपीयन बॅँकेने दिलेल्या पॅकेजने युरोपात आनंदाचे वातावरण आहे. शनिवारी
अर्थमंत्र्यांनी भारतीय उद्योगांसाठी जाहीर केलेल्या विविध सवलती बाजाराला उभारी देऊ शकतात. आगामी जीएसटी कौन्सिलची बैठकही महत्त्वाची ठरेल.
>नाणेनिधीने केली भारताबाबतच्या अंदाजात कपात
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे मत आंतरराष्टÑीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. सन २०१९-२०मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ टक्के राहण्याचा नवा अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. नाणेनिधीने याआधी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा अंदाज ७.३ टक्के राहील, असा अंदाज केला होता.
भारताच्या गैरबॅँकींग क्षेत्रातील काही आस्थापना या मंदीमध्ये असून त्यांचे कार्य योग्य पद्धतीने चाललेले नाही. त्याचप्रमाणे कंपनी क्षेत्रावर असलेले नियंत्रण, मंदीचा प्रभाव यामुळेही अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळे येत असल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत मागणीमध्ये सातत्याने घट होत असल्यामुळे नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये आधीपेक्षा कपात केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था लवकर वाढीला लागण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.०


Web Title: The market has grown due to international developments
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.