आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख दीड महिन्यांनी वाढवली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा कर निर्धारण वर्ष २०२५-२६ साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मंगळवारी याबाबत अपडेट दिली. ही तारीख दीड महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत रिटर्न भरू शकता.
शेअर बाजारात कमाईची सुवर्ण संधी; लवकरच येणार 'या' सरकारी कंपनीचा IPO...
सीबीडीटीने म्हटले आहे की, आयकर रिटर्नच्या स्वरूपात अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. व्यवस्था बदलण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. त्यामुळे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. हे सर्वांना योग्य फाइलिंग करण्यास मदत करेल.
सामान्य श्रेणीतील करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख सहसा ३१ जुलै असते. पगारदारांव्यतिरिक्त, ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही यांचाही यामध्ये समावेश असतो. आता ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत रिटर्न भरू शकतील. या तारखेनंतर रिटर्न भरल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
सीबीडीटीने काय म्हटले?
२०२५-२६ या मूल्यांकन वर्षासाठी अधिसूचित केलेल्या आयटीआरमध्ये काही सुधारणा आहेत. या सुधारणांचे उद्दिष्ट अनुपालन सोपे करणे, पारदर्शकता वाढवणे आणि अचूक अहवाल देणे आहे.
या सुधारणांसाठी सिस्टम डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि टेस्टिंगसाठी अतिरिक्त वेळ लागेल. याशिवाय, ३१ मे २०२५ पर्यंत केलेल्या टीडीएस फाइलिंगचे क्रेडिट जूनच्या सुरुवातीला दिसून येतील. यामुळे रिटर्न भरण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ कमी होईल. या गोष्टी लक्षात घेऊन आणि करदात्यांच्या सोयीसाठी, कर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै वरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे.