LIC News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाशी (LIC) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रंजन पै यांच्या मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्समधील महत्त्वपूर्ण हिस्सा खरेदी करण्यासाठी एलआयसी अटींना अंतिम रूप देत असल्याचं वृत्त आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या देशांतर्गत आरोग्य विमा बाजारात कंपनी एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, एलआयसीचा शेअरमध्ये गुरुवारी किरकोळ वाढ झाली.
काय आहेत डिटेल्स?
इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्समधील ४०-४९% हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. एलआयसीचे मोठे वितरक नेटवर्क आणि आर्थिक ताकद पाहता नवीन भांडवल गुंतवणूक आणि काही सेकंडरी शेअर्स विक्रीचा समावेश असलेल्या या करारामुळे बाजारात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे एलआयसीला देशातील ३ लाख कोटी रुपयांच्या सामान्य विमा बाजारातील संधीचा लाभ घेता येईल.
३१ मार्चपर्यंत डील होणार?
अलीकडेच एलआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितलं होतं की, येत्या दोन आठवड्यांत एलआयसी एका आरोग्य विमा कंपनीतील हिस्सा खरेदी करेल. एलआयसी आरोग्य विमा कंपनीशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे आणि ३१ मार्चपूर्वी अंतिम घोषणा होण्याची अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले होते.
एलआयसीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत, ते आरोग्य विमा व्यवसायात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करू इच्छित असल्याचं म्हटलं होतं.