लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विमा क्षेत्रात पॉलिसींची विक्री करताना ग्राहकांना चुकीची माहिती देऊन किंवा दिशाभूल करून उत्पादने गळ्यात मारण्याचे प्रमाण (मिस-सेलिंग) वाढले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विमा कंपन्यांनी या तक्रारींचे ‘मूळ कारण’ शोधून त्यावर कडक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश इरडाने दिले आहेत.
भारतात विम्याचा प्रसार जागतिक सरासरीच्या (७.३%) तुलनेत केवळ ३.७% आहे. विशेष म्हणजे, लाइफ इन्शुरन्स घेणाऱ्यांचे प्रमाणही २.८ टक्क्यांवरून २.७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
तक्रारींचा आकडा वाढला
अहवालानुसार, जीवन विमा कंपन्यांविरुद्धच्या एकूण तक्रारींचे प्रमाण स्थिर असले, तरी ‘मिस-सेलिंग’च्या तक्रारींचा टक्का लक्षणीयरीत्या वाढला आहे. मागील वर्षी या तक्रारींचा वाटा १९.३३% होता, तो आता २२.१४% वर पोहोचला आहे. वर्षभरात अशा तब्बल २६,६६७ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
नेमकी कशी होते फसवणूक?
एफडीचे आमिष : विमा हा फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगला परतावा देतो, असे खोटे सांगून पॉलिसी विकली जाते. यात ग्राहकांची मोठी फसवणूक होते.
बँकांकडून सक्ती : गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज देताना बँका अनेकदा विमा घेण्याची सक्ती करतात, जे चुकीचे आहे. मात्र, एजंट ही चूक करतात.
खोटी आश्वासने : ‘फक्त ३ वर्षे पैसे भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा’ अशा जाहिराती देऊन कागदपत्रांमध्ये नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातात.
