Trump Jinping Trade Tariff: अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावरून सुरू असलेल्या संघर्षात मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर एक करार झालाय. या कराराचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी जिनिव्हा येथे झालेल्या चर्चेनंतर, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारात चांगली प्रगती झाली असून रविवारी एक करार झाल्याचं म्हटलं.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका आणि चीनमधील शुल्क धोरणानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्के कर लावला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननं अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के कर लावला. एवढंच नव्हे तर चीननं अमेरिकेला होणारी 'दुर्मिळ खनिजां'च निर्यातही थांबवली. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास थांबला होता. आता अमेरिकेनं आधी नमतं घेण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. याचाच अर्थ ट्रम्प यांनी चीनबाबत केलेलं भाकीत चुकीचं ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी याच चीनला डोळे दाखवणारे ट्रम्प आता हतबल कसे झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांनी गेल्या आठवड्यात, ट्रम्प व्यापार युद्धामुळे या वर्षाच्या अखेरीस महागाई ४% पर्यंत वाढेल, असं म्हटलं. या करधोरणामुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होत होतं. ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचा परिणाम दिसू लागला होता, कारण चीनमधून अमेरिकेच्या बंदरांवर आणि विमानतळांवर येणारा माल मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. वॉलमार्ट आणि टार्गेटसारख्या बड्या दुकानदारांनीही दुकानांमधील माल संपेल आणि किंमती वाढतील, असा इशारा दिला होता. त्याचा परिणाम चीनमध्येही दिसून आला, कारण तेथील कारखान्यांमधील उत्पादन कमी झालं.
अमेरिकेसाठी कठीण परिस्थिती
एप्रिलमध्ये चीनच्या कारखान्यांमधील काम १६ महिन्यांच्य तुलनेत सर्वात वेगानं घसरलं. त्यामुळे चीनलाही ही परिस्थिती संपवायची होती. चीननं जागतिक बाजारपेठेवर चुकीच्या पद्धतीने कब्जा केला आहे, त्याच्या व्यापाराला आव्हान देणं गरजेचं आहे, हे सत्य आहे. मात्र, चीननं अमेरिकेसोबतच्या व्यापारात अधिक ताकद दाखवली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ट्रम्प यांच्याप्रमाणे लवकर निवडणुकीला सामोरं जायचं नाहीये. चीनमध्ये ही त्यांच्या आर्थिक धोरणांना फारसा विरोध नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्यात. चीन सरकार यापुढेही अशा उपाययोजना करू शकते.
अमेरिकेसाठी ही परिस्थिती कठीण आहे. ट्रम्प यांनी आपल्या मागील कार्यकाळात जी करसवलत दिली होती, ती वाढवण्याशिवाय सरकारकडे फारसा पर्याय नाही. शिवाय व्याजदर कमी करण्यावरून ट्रम्प प्रशासनाचा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हशी संघर्ष होऊ शकतो. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी असं लवकर होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
चीन उत्तम स्थितीत असेल
फायनान्शियल टाइम्सचे मुख्य आर्थिक भाष्यकार मार्टिन वुल्फ यांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धात चीन चांगल्या स्थितीत असेल. या व्यापारयुद्धात चीनला टाळण्यासाठी अमेरिकेला अतिशय हुशार व्हावं लागेल, असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. चीनकडे अनेक पर्याय आहेत. दुसरीकडे अमेरिका राजकीयदृष्ट्या कमकुवत आहे. अर्थव्यवस्था थोडी कमकुवत दिसत आहे. बाजार कमकुवत दिसत आहेत. या ट्रेड वॉरमुळे अमेरिकन उद्योगांना मोठा फटका बसणारे. यामुळे अमेरिकेतील पुरवठा साखळी कमकुवत होईल आणि काही ठिकाणी ती तुटण्याचीही शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होऊ शकतं, असंही त्यांनी नमूद केलं.