India's growth rate 7% possible next year, IMF convinces Modi government | पुढच्या वर्षी भारताचा विकासदर 7 टक्के शक्य, IMFचा मोदी सरकारला दिलासा
पुढच्या वर्षी भारताचा विकासदर 7 टक्के शक्य, IMFचा मोदी सरकारला दिलासा

मुंबईः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोदी सरकारला दिलासा दिला आहे. भारतानं कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं आयएमएफनं म्हटलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच घरगुती कंपन्याही गुंतवणुकीसाठी पुढे येणार आहे. आयएमएफचे संचालक (आशिया आणि पॅसिफिक विभाग) चेंगयाँग री म्हणाले, सध्याच्या आर्थिक वर्षातील भारताचा विकासदर 6.1 टक्के राहील, पण तोच विकासदर 2020पर्यंत 7 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. बँकांच्या स्थितीत लवकरात लवकर सुधार होण्याची गरज असून, भारताला वित्तीय एकीकरणाची गरज असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. आयएमएफचे उपसंचालक (आशिया आणि पॅसिफिक विभाग) एन्ने-मॅरी गुल्डे-वॉफ म्हणाले की, भारताला नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरमधल्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या लागणार आहेत.  

2019-20मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 6.1 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. त्या तुलनेत 2020 मध्ये भारताच्या विकासदरात वाढ होईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. 2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यानं वाढेल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवली आहे. यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर केवळ 3 टक्के असेल, असा अंदाज संस्थेनं व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी जगाची अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यानं वाढली होती. 


चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एप्रिलमध्ये वर्तवला होता. यानंतर 3 महिन्यांत यामध्ये 0.3 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आधी जागतिक बँकेनंदेखील भारताच्या जीडीपी वाढीचा दर घटवला होता. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7.5 टक्के असेल, असा अंदाज एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जागतिक बँकेनं वर्तवला होता. भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या मरगळ आली असून, येत्या काही दिवसांत अर्थक्षेत्राची स्थिती आणखी खालावेल, असा धोक्याचा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. काही आर्थिक तिमाहांपूर्वी भारताच्या जीडीपी वाढीचा दर चीनपेक्षाही जास्त होता. तो आता बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर 7.5 टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था केवळ 5 टक्क्यांनी वाढली. गेल्या 6 वर्षांमधील हा नीचांक आहे. 


Web Title: India's growth rate 7% possible next year, IMF convinces Modi government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.