अर्जुन : कृष्णा, नवीन इनकम टॅक्स बिल २०२५ मध्ये स्लॅब रेट्समध्ये बदल करून आणि ₹१२ लाखांपर्यंत करमाफी देऊन कर भरणे सोपे केले आहे. या बदलामुळे ₹३५,००० ते ₹१,१०,००० इतकी कर बचत होईल. ती कुठे गुंतवावी?
कृष्ण : १. सर्वप्रथम कर्जमुक्त होणे हे उद्दिष्ट असावे. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३०% पेक्षा जास्त रक्कम कर्जफेडीसाठी जाऊ नये. ज्यांच्यावर जास्त कर्ज आहे, त्यांनी कर बचतीचा उपयोग करून ते लवकर फेडावे. यामुळे क्रेडिट स्कोअरही सुधारेल.
२. कर्जमुक्त झाल्यानंतर गुंतवणुकीकडे वळावे. सध्या लोक शेअर बाजाराऐवजी म्युच्युअल फंड्सला प्राधान्य देत आहेत. ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक वाढत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये गुंतवणूक ₹२४,५०९ कोटी होती, जानेवारी २०२५ मध्ये ती ₹२६,४०० कोटी झाली आहे.
३. कर्जमुक्ती आणि गुंतवणुकीनंतर, व्यक्तीने आपल्या गरजा व खर्च यांचा विचार करावा. जास्त उत्पन्न उपलब्ध असल्यामुळे प्रवास, लक्झरी वस्तू, गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या गोष्टींवर खर्च वाढू शकतो. हा वाढता खर्च अर्थव्यवस्थेतील मागणी वाढवेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
४. ग्राहकांच्या वाढलेल्या खरेदी क्षमतेमुळे उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. ऑटोमोबाइल, फॅशन, FMCG, हेल्थकेअर आणि ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये ग्राहकांची मागणी वाढेल, ज्यामुळे नवीन उत्पादने आणि सेवा बाजारात येतील. व्यवसाय विस्ताराला चालना मिळेल.
ग्राहकांचा वाढता खर्च व्यवसायांसाठी चांगली संधी आहे, विशेषतः पर्यटन आणि वाहन क्षेत्रासाठी. यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतील. सरकारही अर्थव्यवस्थेची वाढ वेगवान करण्यासाठी लोकांचा खर्च वाढावा, यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी पैशाचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कारण जपून केलेली बचत भविष्यात आर्थिक स्थिरता निर्माण करण्यास मदत करू शकते.
- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट