लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आढावा वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत महिला आयकर दात्यांची संख्या २५ टक्के वाढली असल्याची माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. आढावा वर्ष २०१९-२० मध्ये १.८३ कोटी महिलांनी आयकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल केली होती. आढावा वर्ष २०२३-२४ मध्ये हा आकडा वाढून २.२९ कोटी झाला.
वित्त वर्षाच्या पाठोपाठ येणाऱ्या १ एप्रिल ते ३१ मार्च या १२ महिन्यांच्या कालावधीस आढावा वर्ष म्हटले जाते. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आयटीआर दाखल करणाऱ्या महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक ६.८८ लाखांनी अथवा २३ टक्क्यांनी वाढली. २०१९-२० मध्ये महाराष्ट्रातील २९.९४ लाख महिलांनी आयटीआर दाखल केले. २०२३-२४ मध्ये हा आकडा ३६.८३ लाख झाला. दुसऱ्या क्रमांकाची वाढ नोंदविणाऱ्या उत्तर प्रदेशात महिला करदात्यांची संख्या २९ टक्क्यांनी वाढून १५.८१ लाखांवरून २०.४३ लाखांवर गेली.
करदात्यांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र (३६.८३ लाख) पहिल्या क्रमांकावर, गुजरात (२२.५० लाख) दुसऱ्या, तर उत्तर प्रदेश (२०.४३ लाख) तिसऱ्या स्थानी राहिले. तळाशी असलेल्या ३ प्रदेशांत लद्दाख (२०५), लक्षद्वीप (१,१२५) आणि मिझोराम (२,०९०) यांचा समावेश आहे.