ICICI Bank : तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेला वस्तू आणि सेवा कराच्या कथित कमी भरणा प्रकरणी कर विभागाकडून मागणी नोटीस प्राप्त झाली आहे. बँकेने मंगळवारी नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. कर विभागाने बँकेकडे २१६.२७ कोटी रुपये इतक्या GST ची मागणी केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
नोटीस: मुंबई पूर्व आयुक्तालयाच्या CGST च्या अतिरिक्त आयुक्तांनी बँकेला २९ सप्टेंबर २०२५ रोजी 'कारण दाखवा नोटीस' जारी केली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ च्या कलम ७३ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये प्रामुख्याने खात्यांमध्ये विशिष्ट किमान शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना बँकेने दिलेल्या सेवांशी संबंधित आहे. या सेवांवर जीएसटी कमी भरला गेला असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
बँकेची भूमिका: आयसीआयसीआय बँकेने स्पष्ट केले आहे की, हा विषय यापूर्वीही वादाच्या किंवा न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहिला आहे. 'या प्रकरणातील एकूण रक्कम महत्त्वपूर्ण असल्याने, याची माहिती एक्सचेंजला दिली जात आहे,' असे बँकेने म्हटले आहे. बँकेने सांगितले आहे की, ते विहित वेळेत या नोटीसला उत्तर दाखल करतील.
वाचा - दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
शेअर बाजारातील स्थिती
या बातमीच्या पार्श्वभूमीवर, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरची कामगिरी अस्थिर राहिली आहे.
मागील एका महिन्यात आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ४.४० टक्क्यांनी घसरण झाली आहे.
या वर्षात आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केल्यास, शेअरमध्ये ५.०८ टक्क्यांची वाढ झाली आहे.