IDBI Bank Share: आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची वाट पाहणं अधिक लांबत चाललं आहे. कोटक महिंद्रा बँक देखील आयडीबीआय बँकेतील हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक असल्याचं वृत्त आहे. एनडीटीव्ही प्रॉफिटच्या वृत्तानुसार, ओकट्री कॅपिटल आणि फेअरफॅक्स व्यतिरिक्त, कोटक महिंद्रा बँकेनं देखील हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलंय. परंतु, या मुद्द्यावर कोटक महिंद्रा बँकेकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.
६१% हिस्सा विकण्याची चर्चा
केंद्र सरकारच्या एका निवेदनात म्हटलंय, की आयडीबीआय बँकेचं खाजगीकरण २०२६ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम केलं जाईल. सध्या, आयडीबीआय बँकेत केंद्र सरकारचा ४५.४८ टक्के हिस्सा आहे, तर एलआयसीचा ४९.२४ टक्के हिस्सा आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग आयडीबीआय बँकेचा ६१ टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सरकार ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हिस्सा विक्रीसाठी बोली मागवेल असं एका सरकारी अधिकाऱ्यानं यापूर्वी सांगितलं होतं. बँकेचा हिस्सा विकण्याबाबतची चर्चा पहिल्यांदा २०२२ मध्ये सुरू झाली. सध्या, एलआयसी आयडीबीआय बँकेचा प्रमोटर शेअरहोल्डर आहे.
आयडीबीआय बँकेच्या शेअर्सची कामगिरी
शुक्रवारी बीएसईवर आयडीबीआय बँकेचे शेअर्स २.५३ टक्क्यांनी घसरून १००.२५ रुपयांवर बंद झाले. गेल्या सहा महिन्यांत बँकेच्या शेअर्सच्या किमतीत ६.२५ टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात आयडीबीआय बँकेच्या शेअर्सच्या किमतीत ३१.८० टक्के वाढ झाली आहे. बँकेचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०६.९९ आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ६५.८९ आहे. आयडीबीआय बँकेचे मार्केट कॅप ₹१.०७ लाख कोटी आहे. आयडीबीआय बँकेच्या शेअर्सच्या किमती गेल्या ५ वर्षांत १६८ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
