Golden Visa Scheme: गेल्या दोन दिवसांपासून बातम्यांमध्ये असलेल्या गोल्डन व्हिसाबद्दल भारतीयांनी नुकतंच स्वप्न पाहण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांची स्वप्नं भंगणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंयकी त्यांच्याकडून असं काहीही सांगितलं गेलं नाहीये आणि अधिकृत पुष्टीशिवाय प्रसारित होणाऱ्या या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आहेत. यूएईच्या आयडेंटिटी, सिटीझनशिप, कस्टम आणि पोर्ट सिक्युरिटी अथॉरिटीनं (आयसीपी) सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा सर्व बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचं म्हटलंय.
गोल्डन व्हिसा कार्यक्रम निश्चित नियमांनुसारच
यूएई सरकार या योजनेद्वारे काही देशांतील लोकांना आजीवन गोल्डन व्हिसा देत असल्याच्या मीडिया रिपोर्ट्सचे यूएई ऑथॉरिटी फॉर आयडेंटिटी, सिटीझनशिप, कस्टम्स अँड पोर्ट सिक्युरिटीनं (आयसीपी) खंडन केलंय. आयसीपीनं असंही म्हटलंय की गोल्डन व्हिसा कार्यक्रम पूर्व-निर्धारित नियम, कायदे आणि सरकारी निर्णयांनुसारच चालतो.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार? पाहा नवे दर
सरकारी माध्यमातूनच प्रक्रिया
आयसीपीनं दिलेल्या माहितीनुसार गोल्डन व्हिसा प्रोग्राम अंतर्गत सर्व अर्ज अधिकृत सरकारी माध्यमातून प्रोसेस केले जातात. कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत एजन्सीला अर्जांवर प्रक्रिया करण्याचा अधिकार नाही. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असल्याचंही त्यांनी नमूद केले. या दरम्यान, अर्जदाराची सुरक्षितता देखील लक्षात ठेवली जाते. आयसीपीनं, या संदर्भात खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं.
आयसीपीनं म्हटलंय की त्यांनी अलिकडेच एका सल्लागार कंपनीने (परदेशात) जारी केलेलं प्रेस रिलीज पाहिले आहेत, ज्यामध्ये आजीवन यूएई गोल्डन व्हिसाबाबत सांगण्यात आलंय. हे वृत्त अनेक माध्यम संस्था आणि काही यूएई-आधारित कंपन्यांनी प्रसारित केलं होतं. आयसीपीनं कथित अप्रमाणित प्रेस रिलीजचा स्रोत ओळखला नाही, परंतु ज्या संस्थांनी या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलंय. त्यांचा उद्देश यूएईमध्ये राहू इच्छिणाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळणं आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.