Following Lakshmi Vilas Bank, RBI took action against Mantha Urban Co-operative Bank in Maharashtra | लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर RBIची कारवाई, लागू केले निर्बंध

लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर RBIची कारवाई, लागू केले निर्बंध

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहेबँकेवर लादण्यात आलेले निर्बंध हे १७ नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यापासून पुढचे सहा महिने लागू राहणार आहेतरिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू करण्यामागचे कारण सांगितलेले नाही

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर कठोर निर्बंध लागू करून २४ तास उलटत नाहीत तोच अजून एका बँकेवर निर्बंध घातले आहे. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातीलजालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बँकेला काही सूचना करण्यात आल्या असून, बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध हे १७ नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यापासून पुढचे सहा महिने लागू राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार आता मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कुठलेही कर्ज किंवा उधारी देता येणार नाही. तसेच जुन्या कर्जांचे पुनर्गठण किंवा कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही. तसेच बँकेवर नव्याने ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच बँकेला कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्याचा करार करता येणार नाही. मात्र रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू करण्यामागचे कारण सांगितलेले नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेला पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) मधील कथित अफरातफरीची कुणकुण लागली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते.तसेच बँकेला संकटातून वाचवण्यासाठी आरबीआयने २४ सप्टेंबर २०१९ रोजी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घातली होती.

दरम्यान, केंद्र सरकारनं लक्ष्मी विलास बँकेवर महिन्याभराच्या कालावधीसाठी अनेक प्रकारचे निर्बंध आणले आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी नवी मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार १६ डिसेंबरपर्यंत बँकेचे ग्राहक २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केलेल्या शिफारशीनंतर सरकारनं हे पाऊल उचललं. अर्थ मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.याआधी आरबीआयनं येस बँक आणि पीएमसी बँकांसंदर्भातही अशाच प्रकारे निर्णय घेतले होते. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.

अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी विलास बँकेवर एक महिन्याचा मोरेटोरियम लावण्यात आला आहे. १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीसाठी मोरेटोरियम लागू करण्यात आला आहे. आरबीआयनं अधिनियमाच्या कलम ४५ च्या अंतर्गत हा आदेश लागू केला आहे.
पीसीए थ्रेसहोल्ड उल्लंघनाची दखल घेऊन आरबीआयनं लक्ष्मी विलास बँकेला सप्टेंबर २०१९ मध्ये प्रॉम्प्ट करेक्टिव ऍक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत बँकेला ३९६.९९ कोटी रुपयांचा तोटा झाला. बँकेच्या एकूण एनपीएच्या (बुडीत खात्यात गेलेलं कर्ज) तुलनेत हा आकडा २४.५ टक्के इतका आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेला ३५७.१७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Following Lakshmi Vilas Bank, RBI took action against Mantha Urban Co-operative Bank in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.