A five-fold increase of NPAs over the past five years | मोदी सरकारच्या काळात बँकांच्या एनपीएमध्ये पाचपट वाढ

मोदी सरकारच्या काळात बँकांच्या एनपीएमध्ये पाचपट वाढ

- विशाल शिर्के 

पुणे : देशातील आघाडीच्या दहा बँकेतील ढोबळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) २०१४ पूर्वीच्या दहा वर्षांच्या तुलनेत अवघ्या पाच वर्षांत जवळपास पाचपट वाढले आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियापासून बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब बँक, बँक ऑफ इंडिया अशा सरकारी आणि व्यावसायिक बँकांचा समावेश आहे. या बँकांकडे २००३-०४नंतरच्या दहा-अकरा वर्षांच्या कालावधीत साडेचार लाख कोटींचे थकीत कर्ज होते. त्यात २०१४ ते २०१८-१९ या कालावधीत २१.४१ लाख कोटीपर्यंत वाढ झाली आहे.

गेली काही वर्षे बँकांचा एनपीए हा कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेक बड्या बँकांची कर्जे बुडवून काही उद्योगपतींनी परदेशाचा आसरा घेतला आहे. सत्ताधारी आणि विरोधक त्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्योराप करताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकारात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) बँकांच्या एनपीएची माहिती मागविली होती. त्यानुसार २००४ ते २०१४ या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाच्या (२०१४-२०१८) काळात एनपीएचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे.

देशातील आघाडीच्या केवळ दहाच बँकांच्या ढोबळ एनपीएचा येथे विचार करण्यात आला आहे. त्यात २००३-०४ ते २०१३-१४ या कालावधीमध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, आयडीबीआय, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या बँकांमधे मिळून एनपीएचे प्रमाण ४ लाख ५० हजार ५७४ कोटी रुपये होते. त्यानंतर २०१४ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात एनपीए तब्बल २१ लाख ४१ हजार ९२९ कोटींवर पोहोचला. या थकीत रकमेपैकी किती रकमेची वसुली झाली याची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली नाही.

एनपीए रक्कम कोटीत
बँक                          २००३-२०१४        २०१४-मार्च२०१९
अलाहाबाद बँक           १६,९५२                १,०६,३५२
बँक ऑफ बडोदा          ३०,१३३                १,८५,८५५
बँक ऑफ इंडिया          ३६,६१२                २,१८,१९८
बँक ऑफ महाराष्ट्र        १०,०६३                  ७०,५९९
कॅनरा                           २७,२७७               १,६७,४०८
सेंट्रल बँक                     ३६,२१८                १,४६,८०९
आयडीबीआय              २१,७९४                 १,७४,७९०
इंडियन ओव्हरसीज      २३,२८८                 १,५१,५३८
पंजाब नॅशनल               ५०,५३७                ३,१०,९४९
स्टेट बँक ऑफ इंडिया  १,९७,७५०             ६,०९,४३१

सार्वजनिक बँकांची दोन वर्षांत सव्वालाख कोटींची वसुली
सार्वजनिक बँकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षांत थकीत कर्जातून ५१,४५९ आणि ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ८०,४४१ कोटी असे १,३१,९०० कोटी रुपयांची वसुली केली असल्याची माहिती आरबीआयने दिली.

Web Title: A five-fold increase of NPAs over the past five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.