Jio Financial Stock Price: देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून येत आहे. पण आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (JFSL) शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. जिओ फायनान्शिअल आणि जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉक यांच्या संयुक्त उपक्रमाला भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीकडून हिरवा कंदील मिळाला आहे. जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लवकरच भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करू शकते, असं मानलं जात आहे. या बातमीमुळे जेएफएसएलच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
कंपनीचा शेअर काल बीएसईवर २९१.५० रुपयांवर बंद झाला आणि आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात २९९.२० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३६८.३० रुपये आहे. गेल्या वर्षी २० जून रोजी तो या पातळीवर पोहोचला होता. शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर १९८.६० रुपये आहे. यावर्षी ३ मार्च रोजी तो या पातळीवर पोहोचला होता. पण ब्लॅकरॉकसोबतच्या संयुक्त उपक्रमाला सेबीकडून हिरवा कंदील मिळताच त्यात तेजी दिसून येत आहे. सेबीच्या नियमांनुसार कंपनी सहा महिन्यांत आपला व्यवसाय सुरू करू शकते. जिओ ब्लॅकरॉकचे एमडी आणि सीईओ म्हणून सिड स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिटायरमेंटशी निगडित नियमांमध्ये मोठे बदल, सरकारी कर्मचाऱ्यांना जाणून घेणं आवश्यक
अलादीनचा दिवा
भारतातील म्युच्युअल फंड उद्योग झपाट्याने वाढत आहे. एप्रिलअखेर या उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता ७० लाख कोटी रुपये होती. जिओब्लॅकरॉक उद्योगात प्रवेश करणारी ४८ वी एएमसी असेल. देशातील म्युच्युअल फंड उद्योग गेल्या १० वर्षांपासून वार्षिक १८ टक्के दरानं वाढत आहे. देशात ८.८९ कोटी एसआयपी असून मासिक पद्धतशीर आवक २६,६३२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जिओब्लॅकरॉक विविध प्रकारची गुंतवणूक उत्पादनं आणण्याच्या तयारीत आहे. यात त्याला ब्लॅकरॉकच्या टेक प्लॅटफॉर्म 'अलादीन'ची साथ मिळणार आहे.
Aladdin काय आहे?
‘अलादीन’ (अॅसेट, लायबिलिटी अँड डेब्ट अँड डेरिव्हेटिव्ह इन्व्हेस्टमेंट नेटवर्क) हे ब्लॅकरॉकनं विकसित केलेलं एक अत्यंत अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. ते पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम मूल्यांकन आणि गुंतवणूक ऑप्टिमायझेशनसाठी वापरलं जातं. जगभरातील अनेक आघाडीचे मालमत्ता व्यवस्थापक आणि संस्था अलादीन वापरतात आणि आता ही तंत्रज्ञान भारतातील सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचणार आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अलादीनच्या एन्ट्रीमुळे गुंतवणुकीच्या प्रत्येक पैलूमध्ये डेटा-संचालित निर्णय, रिअल-टाइम रिस्क अॅनालिसिस आणि कस्टम पोर्टफोलिओ निर्मिती शक्य होईल. ही सुविधा आतापर्यंत फक्त मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना उपलब्ध होती, परंतु आता ती JioBlackRock द्वारे भारतातील सामान्य गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल.