Bitcoin News: क्रिप्टोकरन्सी सध्या चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टोची मागणी पुन्हा वाढली. असं असलं तरी दुसरीकडे क्रिप्टोची किंमत सध्या लक्षणीय रित्या घसरत आहे. अशातच एका कंपनीच्या सहसंस्थापकाने बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीबाबत खळबळजनक विधान केलंय.
मायक्रोस्ट्रॅटेजीचे सहसंस्थापक मायकेल सेलर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे विचित्र सल्ला दिलाय. बिटकॉईनच्या किंमतीत मोठी घसरण होत असताना त्यांनी ही पोस्ट केली आहे. 'गरज पडली तर किडनी विका, पण बिटकॉइन ठेवा,' असा अजब सल्ला त्यांनी दिलाय. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. सेलर यांची ही पोस्ट वादग्रस्त असल्याचंही अनेकजण म्हणत आहे..
आयफोननंतर आता बिटकॉईन
काही वर्षांपूर्वी भारतात आयफोन खरेदी करणं हे स्वप्न मानलं जात होतं. किडनी विका आणि आयफोन घ्या अशी चर्चा मजेमजेत करताना अनेकदा तुम्ही ऐकली असेल. यावर अनेक जोक्स आणि मीम्सही बनवण्यात आलेत. आता बिटकॉइन खरेदी करण्यासाठी किडनी विकण्याची चर्चा आहे. एका बिटकॉइनची किंमत सुमारे ७४ लाख रुपये आहे.
Sell a kidney if you must, but keep the Bitcoin.
— Michael Saylor⚡️ (@saylor) February 28, 2025
बिटकॉईन मध्ये किती घसरण झाली?
गेल्या काही काळापासून बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घसरण होत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता त्याची किंमत सुमारे ७४ लाख रुपये होती. गेल्या महिन्याभरात त्यात १६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. महिनाभरापूर्वी एका बिटकॉइनची किंमत ८८ लाख रुपयांपेक्षा जास्त होती. तर गेल्या ५ दिवसांत बिटकॉईन जवळपास ७ टक्क्यांनी घसरली आहे. बिटकॉईनमधील घसरणीचं कारण महागाईचा दबाव आणि ट्रम्प यांचं शुल्क धोरण असल्याचे सांगितलं जात आहे.
हा वाद कशासाठी?
सेलर यांना क्रिप्टो समर्थक मानलं जातं. किडनी विका आणि बिटकॉईन ठेवा हे त्यांनी केलेले विधान मूर्खपणाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेलर यांनी असं विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२१ मध्ये सेलर यांना अशाच टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांनी बिटकॉइन खरेदी करण्यासाठी घरं गहाण ठेवण्याचं आवाहन केलं होतं. २०२२ मध्ये बिटकॉईन क्रॅश झाल्यानंतर हा सल्ला चुकीचा ठरला होता.