गेल्या सहा आठवड्यांत क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) जगात भूकंप आला आहे. या सहा आठवड्यांत गुंतवणूकदारांचे तब्बल $१.१५ ट्रिलियन (भारतीय चलनानुसार सुमारे १०० लाख कोटी रुपये) स्वाहा झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांवर अक्षरश: डोकं झोडून घ्यायची वेळ आली आहे. या तडाख्यापासून अगदी बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरिअम (Ethereum) सारख्या क्रिप्टोकरन्सीही वाचू शकल्या नाहीत.
मार्केट कॅप 1.15 ट्रिलियन डॉलरने घसरले -
कॉइनमार्केटकैपच्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप $४.२८ ट्रिलियन होते, जे बुधवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत) घसरून $३.१३ ट्रिलियनवर आले. अशा प्रकारे गेल्या ६ आठवड्यांत क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप १.१५ ट्रिलियन डॉलरने घसरले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या या घसरणीसंदर्भात बाजारातील तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काही लोकांच्या मते हा 'क्रिप्टो विंटर' (क्रिप्टो बाजारात दीर्घ मंदी) परतीचा सुरुवातीचा टप्पा आहे. तर काहींच्या मते, ही घसरण एका चांगल्या उसळीचा मार्ग मोकळा करू शकते.
६ आठवड्यांत त्यात २७ टक्क्यांची मोठी घसरण -
जगातील सर्वात महागडी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनलाही मोठा फटका बसला आहे. सहा आठवड्यांपूर्वी $१,२६,००० च्या विक्रमी स्तरावर पोहोचलेले बिटकॉइन बुधवारी संध्याकाळी $९१,४०० च्या आसपास ट्रेड करत होते. अर्थात, ६ आठवड्यांत त्यात २७ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी बिटकॉइनची किंमत सात महिन्यांत पहिल्यांदाच $९०,००० च्या खाली गेली होती. यामुळे २०२५ मधील त्याची संपूर्ण वाढ संपुष्टात आली होती. गेल्या ७ दिवसांचा विचार करता, बिटकॉइन १३ टक्क्यांनी घसरला आहे.
असं आहे घसरणीची कारणे -
बाजारातील विश्लेषकांच्या मते या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. यांत, अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी होणे. ईटीएफ (ETF - Exchange Traded Fund) मधून पैसे काढणे, मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन केलेल्या गुंतवणुकीचे 'लिक्विडेशन' (Liquidation) होणे, तसेच मोठ्या गुंतवणूकदारांकडून नफावसुली (Profit Booking), अशा अनेक कारणांचा समावेश आहे.
