donald trump meme coin fell : पुरुष बाहेर जरी सिंह असला तरी बायकोसमोर मांजर होते, असे विनोद तुम्हीही ऐकले असेल. याला महासत्ता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील अपवाद नाहीत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी नुकतेच स्वतःचे मीम कॉइन ($MELANIA) लाँच केले आहे. मात्र, आपल्या बायकोच्या या निर्णयाने पती डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे नुकसान झालं आहे. नवीन क्रिप्टोकरन्सी लाँच केल्यामुळे अध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वतःच्या मीम कॉईन $TRUMP च्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
$MELANIA कॉइनचा भाव वाढला
मेलानिया ट्रम्प यांनी १९ जानेवारी २०२५ रोजी $MELANIA लाँच केले. हे नाणे लाँच होताच ते २४,००० टक्क्यांनी वाढले आणि १३ डॉलरवर पोहोचले. यासह, त्याचे मार्केट कॅप १३ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले. मेलानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवीन नाणे लॉन्च करण्याची घोषणा केली होती.
$TRUMP कॉइनमध्ये मोठी घसरण
डोनाल्ड ट्रम्प यांचे मीम कॉइन $TRUMP लाँचच्या वेळी खूप चर्चेत होते. पहिल्या दिवशी त्याची किंमत ३०० टक्क्यांनी वाढली आणि त्याची मार्केट कॅप १४ अब्ज डॉलर्स झाली. परंतु, मेलानियाचे नाणे लॉन्च झाल्यानंतर काही मिनिटांत $TRUMP ची किंमत जवळपास ५० टक्क्यांनी घसरली.
७.५अब्ज डॉलर्सचे नुकसान
रिपोर्टनुसार, मेलानिया यांच्या कॉइनचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कॉइनला फटका बसला. $TRUMP मीम कॉइनची किंमत अवघ्या १० मिनिटांत ७.५ अब्ज डॉलर्सने घसरली. अनेक गुंतवणूकदारांनी ट्रम्प यांच्या कॉइनमधील पैसे काढून मेलानिया यांच्या कॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्रम्प यांच्या मीम कॉइनमध्ये मोठी घसरण झाली.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयापासून पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सी फॉर्मात आली आहे. आतापर्यंत अनेक क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, क्रिप्टोकरन्सी मार्केट अस्थिर आहे. अनेकदा नवीन क्रिप्टोकरन्सी लाँच केली जाते तेव्हा विद्यमान टोकन्सवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. $MELANIA ची वाढती लोकप्रियता आणि मागणी यामुळे $TRUMP मीम कॉईनला भविष्यात आणखी स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते असे तज्ञांचे मत आहे.
मेलानियाच्या शब्दांनी केली कमाल
आपली क्रिप्टोकरन्सी लाँच करताना मेलानिया ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांना आकर्षित केलं. त्या म्हणाल्या, "हा केवळ एक मजेदार उपक्रम नाही, तर माझ्या समर्थकांसाठी ही एक नवीन संधी आहे. लोकांनी या क्रिप्टोकरन्सीचा एक भाग व्हावे आणि ते स्वीकारावे अशी माझी इच्छा आहे." या आवाहनानंतर समर्थक कॉइन खरेदीवर तुटून पडले. काही वेळात $MELANIA च्या किमती गगनाला भिडल्या.
डिस्क्लेमर : (आम्ही फक्त क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती दिलेली आहे. बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.)