Cryptocurrency Crash: गेल्या २४ तासांत क्रिप्टोकरन्सीचं (Cryptocurrency) जग हादरलं आहे. क्रिप्टो मार्केट कॅप ६ टक्क्यांहून अधिक घसरून ३ लाख कोटी डॉलरच्या खाली आलंय. बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरियमसह (Ethereum) जगातील मोठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली. क्रिप्टोमधील ही घसरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु बऱ्याच काळानंतर २४ तासांत ही सर्वात मोठी घसरण आहे.
कॉईनमार्केटकॅपनुसार, काल गुरुवारी सकाळी ९:३० वाजता क्रिप्टोकरन्सीचं मार्केट कॅप ३.१४ लाख कोटी डॉलर होते, जे आज सकाळी ९:३० वाजता २.९५ लाख कोटी डॉलर एवढं राहिलं. म्हणजेच, २४ तासांत त्यात ६ टक्क्यांहून अधिक घट झाली. अशा प्रकारे गेल्या २४ तासांत गुंतवणूकदारांचे सुमारे १७ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
क्रिप्टोचा फियर अँड ग्रीड इंडेक्स ११ वर आला आहे, जो दर्शवतो की क्रिप्टो मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याचा अर्थ गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सी विकत आहेत. हा इंडेक्स ० ते १०० च्या दरम्यान असतो आणि तो शून्याच्या जितका जवळ असेल, तितकी बाजारात भीती जास्त असते.
मोठ्या क्रिप्टोमध्ये मोठी घसरण
गेले २४ तास बिटकॉइनसह अनेक मोठ्या कंपन्यांसाठी खूप वाईट ठरले आहेत. यात ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. बिटकॉइन ९० हजार डॉलरच्या खूप खाली आला आहे. गुरुवारी सकाळी ९:३० वाजता बिटकॉइन ७.१७% च्या घसरणीसह ८५,७५० डॉलरवर ट्रेड करत होता. तसेच, गेल्या ७ दिवसांत बिटकॉइन १३ टक्क्यांहून अधिक खाली आली.
इथेरियम, रिपल, सोलाना, कार्डानो इत्यादीमध्ये देखील २४ तासांत ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सकाळी ९:३० वाजता इथेरियम ७.५३% च्या घसरणीसह २७९९ डॉलर, रिपल ७% च्या घसरणीसह १.९७ डॉलर, सोलाना ७.२८% च्या घसरणीसह सुमारे १३२ डॉलर आणि कार्डानो ७.८७% च्या घसरणीसह ०.४२ डॉलरवर ट्रेड करत होते.
टॉप १०० क्रिप्टो रेड झोनमध्ये
कॉईनमार्केटकॅपनुसार, टॉप १०० क्रिप्टो रेड झोनमध्ये ट्रेड करत आहेत, म्हणजेच सर्व क्रिप्टोचे नुकसान झाले आहे. अनेक क्रिप्टो अशा आहेत ज्यात २४ तासांत १० टक्क्यांहून अधिक, इतकेच काय तर सुमारे २० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यात टनकॉइन, कॅनटन, नीअर प्रोटोकॉल, स्टार्कनेट, डॅश, स्टोरी, मॉर्फो, एमवायएक्स फायनान्स यांचा समावेश आहे.
क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण का?
क्रिप्टो मार्केटमधील घसरणीची अनेक कारणं समोर येत आहेत. विश्लेषकांचं म्हणणे आहे की, गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची इच्छा कमी झाली आहे. ही आर्थिक स्थिती, ट्रेजरी यील्ड वाढणं आणि फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यास उशीर करू शकते या आशेवर प्रतिक्रिया देत आहेत. या मॅक्रो दबावांमुळे उच्च-अस्थिरता असलेल्या ॲसेट्स अधिक कमजोर बनल्या आहेत. या कारणामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.
