Crypto Market Down: आज २ फेब्रुवारी रोजी बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण होऊन ती ७५,००० डॉलर्सच्या खाली आली आहे. 'कॉइनमार्केट कॅप'च्या आकडेवारीनुसार, बिटकॉइनची किंमत ७४,६८३.६३ डॉलर्सवर होती. एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेनं सुरू केलेल्या ट्रेड वॉरनंतरची ही (Trade War) सर्वात नीचांकी पातळी आहे.
सलग चार महिने घसरण सुरूच
बिटकॉइनच्या किमतीत २०२५ मधील उच्चांकापासून सुमारे ४०% घट झाली आहे. एकट्या जानेवारी महिन्यात यात ११% घसरण पाहायला मिळाली. ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेली ही घसरण सलग चौथ्या महिन्यातही कायम आहे, जी २०१८ नंतरची बिटकॉइनमधील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. केवळ बिटकॉइनच नाही, तर जगातील दुसरी मोठी क्रिप्टोकरन्सी 'एथेरियम' देखील २,२०० डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली घसरली आहे.
सलग तिसऱ्या दिवशी चांदी आपटली; ₹१६ हजारांनी कमी झाली किंमत; सोनंही झालं स्वस्त, पाहा नवे दर
घसरणीची प्रमुख कारणं
'डेल्टा एक्सचेंज'च्या रिसर्च ॲनालिस्ट रिया सहगल यांच्या मते, खरेदीदारांचा अभाव आणि विश्वासाची कमतरता यामुळे विक्रीचा दबाव वाढला आहे. या आठवड्यात कमी तरलता असलेल्या वीकेंड ट्रेड दरम्यान २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पोझिशन्स संपल्यामुळे किमती वेगानं खाली आल्या. जानेवारी महिन्यात अमेरिकन 'स्पॉट बिटकॉइन ईटीएफ'मधून १.६ अब्ज डॉलर्सची झालेला नेट आऊटफ्लो हे संस्थागत जोखीम कमी झाल्याचं दर्शवते.
आर्थिक आणि राजकीय दबाव
सहगल यांनी नमूद केलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदासाठी पसंती दाखवल्यानं बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. वॉर्श यांना कडक मौद्रिक धोरणाचं समर्थक मानलं जात असल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला आणि क्रिप्टोसारख्या जोखीम असलेल्या मालमत्तांची विक्री वाढली. यासोबतच, इराणमधील अब्बास बंदरावर झालेल्या स्फोटाच्या बातम्या आणि अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तांकडे मोर्चा वळवला आहे.
तांत्रिक स्थिती आणि भविष्यातील अंदाज
तांत्रिकदृष्ट्या बिटकॉइन अजूनही ८०,०००-८२,००० डॉलर्सच्या रेझिस्टंस लेव्हलच्या खाली आहे आणि आता ते ७२,०००-७०,००० डॉलर्सपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. एथेरियम देखील २,५०० डॉलर्सच्या खाली असून ते २,००० डॉलर्सच्या पातळीपर्यंत घसरण्याचा धोका आहे. जोपर्यंत आर्थिक स्थैर्य परतत नाही आणि ईटीएफमधील गुंतवणूक पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत क्रिप्टो बाजार संरक्षणात्मक भूमिकेत राहण्याची शक्यता आहे.
