Bitcoin Return Chart: क्रिप्टोकरन्सीबद्दल (cryptocurrency), विशेषतः बिटकॉइनबद्दल (Bitcoin) बरीच चर्चा आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे, कारण गेल्या ५ वर्षात बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीनं तुफान परतावा दिलाय. परताव्याच्या बाबतीत, बिटकॉइननं सोनं, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींना खूप मागे टाकलंय. याचं मोठं कारण म्हणजे तुम्ही क्रिप्टोमध्ये १०० रुपये देखील गुंतवू शकता.
खरंतर, क्रिप्टो एक्सचेंज गुंतवणूकदारांना किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करण्याची परवानगी देतात. तुम्ही फक्त १००-२०० रुपयांमध्ये बिटकॉइन देखील खरेदी करू शकता. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम एक्सचेंज निवडावं लागतं.
उदाहरणावरुन समजून घेऊ
जर तुम्ही गेल्या ५ वर्षांपासून बिटकॉइनमध्ये दरमहा फक्त ४०० रुपये गुंतवले असते, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ७९,५०० रुपये मिळाले असते. या ५ वर्षात तुम्हाला एकूण २४,००० रुपये गुंतवावे लागले असते, तर ५ वर्षात तुम्हाला व्याज म्हणून ५५,५०० रुपये मिळाले असते. गेल्या ५ वर्षात बिटकॉइननं २३१.२५ टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये दरमहा ४०० रुपयांची एसआयपी केली असती, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ५२.१७ टक्के परतावा मिळाला असता, म्हणजेच एकूण ३६,५२० रुपये, ज्यामध्ये २४,००० रुपये तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आहे आणि तुम्हाला १२,५२० रुपये व्याज म्हणून मिळाले असते.
गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का?
बिटकॉइनमध्येही जोखीम आहेत. बिटकॉइन अत्यंत अस्थिर आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम समजून घ्या. भारतात, क्रिप्टोकरन्सीवर ३०% कर (नफ्यावर) आणि १% टीडीएस लागू आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमचं क्रिप्टो सुरक्षित वॉलेटमध्ये ठेवा आणि २FA (टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन) वापरा.
विशेष म्हणजे क्रिप्टो अजूनही कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे चालवले जात नाही. परंतु एका दशकात बिटकॉइननं ज्या दरानं परतावा दिला आहे ते पाहता, गुंतवणूकदार जोखीम घेत आहेत. बिटकॉइनची सध्याची लाईव्ह किंमत ₹१,०४,८०,४७९.१९ आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)