Pi Network crypto: काही महिन्यांपासून क्रिप्टो मार्केटची चर्चा फारशी दिसत नसली, तरी आता पुन्हा क्रिप्टोची चर्चा सुरू झालीये. याचं कारण म्हणजे पाय नेटवर्क क्रिप्टो. पाय नेटवर्क क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढू लागल्यात. अवघ्या चार दिवसांत त्यानं बिटकॉईन, एथेरियम, डॉगेकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीला मागे टाकलंय. यानं चार दिवसांत जवळपास १५० टक्के परतावा दिलाय. ही क्रिप्टोकरन्सी २० फेब्रुवारीला लाँच झाली होती. यानंतर त्याची किंमत कोसळली. २४ तासांत त्यात निम्म्याहून अधिक घट झाली होती, पण आता यात जोरदार तेजी दिसून येत आहे.
पाय नेटवर्क कॉइन २० फेब्रुवारी रोजी १.८४ डॉलरमध्ये लाँच करण्यात आली होती. लाँचिंगनंतर त्यात घसरण होऊ लागली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारीला दुपारी १.३० च्या सुमारास त्याची किंमत ०.६४ डॉलरपर्यंत घसरली. आतापर्यंतचे हे सर्वात कमी मूल्य आहे. यानंतर त्यात तेजी दिसू लागली आहे.
एक लाखाचे झाले अडीच लाख
पाय नेटवर्क कॉइनने चार दिवसांत गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. मंगळवारी रात्री १० वाजता याची किंमत १.५९ डॉलर होती. त्यामुळे या चार दिवसांत त्यात सुमारे १४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर तुम्ही चार दिवसांपूर्वी या क्रिप्टोकरन्सीमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्यांची किंमत सुमारे २.५० लाख रुपये झाली असती. म्हणजे एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला अवघ्या चार दिवसांत दीड लाख रुपयांचा फायदा झाला असता.
पाय नेटवर्क म्हणजे काय?
पाय नेटवर्क एक वेब ३ ब्लॉकचेन प्रोजेक्ट आहे. हे युझर्स त्यांच्या स्मार्टफोनवर क्रिप्टोकरन्सी माइन करण्यास परवानगी देते. याची स्थापना स्टॅनफोर्ड, पीएचडी निकोलस कोक्लिस आणि चेंगडियाओ फॅन यांनी २०१९ मध्ये केली होती. बिनेन्स, कॉइनडीसीएक्स, ओकेएक्स आणि बिटगेट सारख्या प्रमुख एक्सचेंजवर पायच्या लिस्टिंगमुळे युझर्सना प्रथमच त्यांचे होल्डिंग विकण्याची परवानगी मिळाली.
दुसऱ्या क्रिप्टोंची स्थिती कशी आहे?
पाय नेटवर्कच्या तुलनेत इतर क्रिप्टोंमध्ये घसरण दिसून येत आहे. गेल्या ५ दिवसांत बिटकॉईनमध्ये ४.४७ टक्क्यांची घसरण झाली. तर एथेरियममध्ये ११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. एलन मस्क यांची आवडती क्रिप्टोकरन्सी मानली जाणारी डॉगेकॉईनही ५ दिवसांत जवळपास २० टक्क्यांनी घसरली आहे.
(टीप - यामध्ये केवळ क्रिप्टोच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)