Lokmat Money > बिझनेस न्यूज > कच्च्या तेलाच्या भडक्याने शेअर बाजारही होरपळला!

कच्च्या तेलाच्या भडक्याने शेअर बाजारही होरपळला!

सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या तेल प्रकल्पांवर हल्ला झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर भडकल्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराला बसली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:39 AM2019-09-18T06:39:18+5:302019-09-18T06:40:30+5:30

सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या तेल प्रकल्पांवर हल्ला झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर भडकल्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराला बसली.

 Crude oil boom also raises the stock market! | कच्च्या तेलाच्या भडक्याने शेअर बाजारही होरपळला!

कच्च्या तेलाच्या भडक्याने शेअर बाजारही होरपळला!

मुंबई : सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या तेल प्रकल्पांवर हल्ला झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर भडकल्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराला बसली. मंगळवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६४२ अंकांनी आपटला, तर निफ्टीत १८५ अंकांची घट झाली आहे.
या घसरणीमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना २.३० लाख कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४२.२२ अंकांनी घसरून ३६,४८१.0९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८५.९0 अंकांनी घसरून १0,८१७.६0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती आणि एसबीआय यांचे समभाग ६.१९ टक्क्यांपर्यंत घसरले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी एचयूएल, एशियन पेंट्स आणि इन्फोसिस या तीन कंपन्यांचे समभाग वाढले.
गेल्या आठवड्यात सौदी येथील अरामको कंपनीवर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्याचा परिणाम जगभरातल्या इंधन पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती चांगल्याच भडकल्या. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत झाला. याचाच प्रत्यक्ष परिणाम शेअर बाजारावर झालेला पाहण्यास मिळाला. या आधी ३ सप्टेंबरला सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची घसरण दिसून आली होती. भारतातही पेट्रोल व डिझेलचे दर पाच ते सहा रुपयांनी भडकण्याची चिन्हे आहेत.
वाहन उद्योग आणि बँकिंगमध्ये घसरण
वाहन उद्योग व बँकिंग क्षेत्रात घसरण झाली. बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक ७५५ अंकांनी आपटला. वाहन उद्योग कंपन्यांचा निर्देशांक ६२१ अंकांना खाली आला.
>बाजारातील गुंतवणूकदारांना कोणती धास्ती?
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसेल. आधीच देशाचा आर्थिक वृद्धिदर ५ टक्के अशा नीचांकी पातळीवर आला आहे. त्यात नजीकच्या भविष्यात सुधारणा होण्याची शक्यता दिसून येत नाही.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सोमवारी म्हटले होते की, तेलाच्या किमती भडकल्यास भारताच्या चालू खात्यातील तूट आणि वित्तीय तूट वाढेल. याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. सौदीतील तेल कंपनीवर हल्ला झाल्यानंतर अमेरिका व इराण यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्याचाही गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.

Web Title:  Crude oil boom also raises the stock market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.