The country is reeling from a severe recession, with worrying figures for the second quarter | देशावर भीषण मंदीचे सावट, समोर आली दुसऱ्या तिमाहीतील चिंता वाढवणारी आकडेवारी

देशावर भीषण मंदीचे सावट, समोर आली दुसऱ्या तिमाहीतील चिंता वाढवणारी आकडेवारी

ठळक मुद्देपहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल २४ टक्क्यांनी घट झाल्यानंतर आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्येही जीडीपीमध्ये ७.५ टक्क्यांनी घट नोंदवली गेलीया आकडेवारीचा विचार केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत सुधारणा झाली आहेसलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी निगेटिव्ह राहणे हे चांगले संकेत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव आणि कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त दणका बसला आहे. त्याचदरम्यान आज प्रसिद्ध झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारी आकडेवारीने अधिकच चिंता वाढवली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल २४ टक्क्यांनी घट झाल्यानंतर आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्येही जीडीपीमध्ये ७.५ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. सलग दोन तिमाहीमध्ये देशाच्या तिमाहीत नकारात्मक वाढ झाल्याने देशाची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत असल्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचा विचार केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. मात्र सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी निगेटिव्ह राहणे हे चांगले संकेत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्था नकारात्मक राहिल्यास तांत्रिकदृष्ट्या ती मंदी मानली जाते. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था हळूहळू अनलॉक होत होती. याचा अर्थ कठोर लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला हळूहळू उघडण्यात येत आहे.

दरम्यान, या आकडेवारीबाबत चिफ इकॉनॉमिक अ‍ॅडव्हायझर यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यस्था चांगली कामगिरी करत आहे. कोरोनाच्याआधी अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत होती. मात्र या आपत्तीमुळे अर्थव्यवस्थेत संकोच झाला आहे. त्यामुळेच पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ नकारात्मक होऊन सुमारे उणे २४ टक्के झाली होती. मात्र पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत चांगली सुधारणा झाली आहे. उत्पादन क्षेत्रात ०.६ टक्के आणि कृषीक्षेत्रात ३.४ टक्क्यांनी वाढ नोंद झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरच्या तिमाहीसाठी अर्थव्यवस्थेत ८.६ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज बांधला होता तर केअर रेटिंग्सने सप्टेंबरच्या तिमाहीसाठी ९.९ टक्क्यांनी घटीचा अंदाज वर्तवला होता. याचा अर्थ अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत किरकोळ सुधारणा होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

कोअर सेक्टरचा विचार केला तर ऑक्टोबरमध्ये वाढ -२.५ टक्के राहिली. ती सप्टेंबरच्या ०.८ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. कोळसा, कच्चे तेल, स्टील, पेट्रो रिफायनिंग, वीज आणि नैसर्गिक वायू या उद्योगांना कुठल्याही अर्थव्यवस्थेचा पाया मानले जाते. या सर्वांना कोअर सेक्टर म्हणतात.  

मंदी म्हणजे काय
अर्थव्यवस्थेच्या परिभाषेनुसार जर कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत सलग दोन तिमाहीमध्ये निगेटिव्ह वाढ झाली तर अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी घटते. त्याला मंदीची अवस्था असे म्हटले जाते. याचा अर्थ देश तांत्रिकदृष्ट्या मंदीच्या फेऱ्यात सापडला आहे. कारण या आर्थिक वर्षात सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपी निगेटिव्ह आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The country is reeling from a severe recession, with worrying figures for the second quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.