Coronavirus: Retailers lose $ 500 million | Coronavirus : कोरोनाचा फटका; रिटेलर्सचा तोटा ५०० दशलक्ष डॉलरवर

Coronavirus : कोरोनाचा फटका; रिटेलर्सचा तोटा ५०० दशलक्ष डॉलरवर

बंगळुरू : कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन सरकारने मॉल्स, कपड्यांची दुकाने तसेच अन्य दुकानांवर बंद ठेवण्याची सक्ती केल्याने देशातील रिटेलर्सना ५०० दशलक्ष डॉलरचा तोटा होणार आहे. रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाने ही माहिती जाहीर केली आहे.
भारतातील रिटेलर्सकडून रोजच्या अत्यावश्यक नसलेल्या बाबींपैकी कपडे, दागदागिने यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. विविध दुकाने, मॉल्स तसेच आॅनलाइन शॉपिंगद्वारे याबाबी विकल्या जातात. देशात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मॉल्स तसेच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रिटेलर्सना मोठा फटका बसला आहे. याशिवाय या क्षेत्रात काम करीत असलेल्या आठ दशलक्ष लोकांचा रोजगारही कमी झाल्याचे रिटेलर्स असोसिएशन आॅफ
इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या निर्बंधानंतर सध्या रिटेलर्सकडून रोजच्या गरजेच्या वस्तू व किराणा माल यांचाच पुरवठा केला जात आहे.

२५ टक्के व्यक्ती संघटित क्षेत्रातील
भारताच्या रिटेल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या एकूण व्यक्तींपैकी केवळ २५ टक्के व्यक्ती या संघटित क्षेत्रात काम करीत आहेत. उर्वरित असंघटित क्षेत्रात असल्याने त्यांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याने गेल्या वर्षभरापासून रिटेल क्षेत्रातील उलाढाल मंदावली आहे. त्यातच कोरोनाने भर घातली आहे.

कोरोनाचा प्रभाव रिटेल क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर पडला असून, तो आगामी सहा महिन्यांपर्यंत जाणवेल. येत्या दोन महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार थंडावणार असला तरी त्यानंतर लगेचच ग्राहक खरेदीसाठी येण्याची शक्यता नाही. यामुळे या क्षेत्राला किती फटका बसला ते सहा महिन्यांनंतरच निश्चित समजू शकेल.
- कुमार राजगोपालन, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडिया

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Retailers lose $ 500 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.