Coronavirus: $ 640 million hit industry; Letter from the Association of Industries | Coronavirus : ६४० दशलक्ष डॉलरचा उद्योगांना फटका; असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीजचे पत्र

Coronavirus : ६४० दशलक्ष डॉलरचा उद्योगांना फटका; असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीजचे पत्र

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे भारतातील उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला असून, यामुळे ६४० दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान होण्याची भीती आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी व्यक्त केली आहे. हा प्रभाव आगामी दोन वर्ष कायम राहण्याची भीती असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास साडेपाच टक्क्यांपर्यंत राहू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विजय कलंत्री यांनी केंद्र सरकारला कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे भारतीय उद्योगक्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर पत्र पाठविले असून, त्यामध्ये वरील भीती व्यक्त करण्यात आली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे व्यवसाय तसेच उत्पादन ठप्प झाले असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ६४० दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
या धोक्यामुळे उद्योगक्षेत्राला ज्या विविध बाबींचा सामना करावा लागत आहे त्याचे सविस्तर विवेचन या पत्रामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये बड्या उद्योगांकडे असलेली बाकी मिळण्यात येणाºया अडचणी, विविध एसएमई व उद्योगांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात त्यांना भेडसावणाºया अडचणी, उत्पादन प्रक्रियेसाठी वाढलेला खर्च या प्रमुख बाबी असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशातील उत्पादन ठप्प झाले असून, अनेक मोठ्या उद्योगसमूहांनी एसएमईकडून होत असलेली खरेदी थांबविली आहे. याचा परिणाम एसएमईला कर्मचारी कपात करण्याशिवाय गत्यंतर नसण्यात झाला आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते, आयकर तसेच जीएसटीची द्यावयाची रक्कम यासाठी कोणतीही शिल्लक या उद्योगांकडे नसल्यामुळे त्यांच्यासमोर तीव्र आर्थिक संकट उभे राहिले आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारांमध्ये होत असलेल्या तीव्र घसरणीमुळे विविध कंपन्यांचे बाजारमूल्य घटले असल्यामुळे त्यांची पतही काही प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी या उद्योगांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Coronavirus: $ 640 million hit industry; Letter from the Association of Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.