Comfort! Edible oil prices fall by Rs 10; Consequences of falling international market rates | दिलासा! खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांनी घसरण; आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा परिणाम

दिलासा! खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांनी घसरण; आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा परिणाम

अविनाश कोळी 

सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून सतत दरवाढीचे नवे विक्रम नोंदविणाऱ्या खाद्यतेलामध्ये गेल्या आठवडाभरात लिटरमागे ८ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना अल्प दिलासा मिळाला आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीवर व शासनाच्या धोरणांवर खाद्यतेलाचे दर अवलंबून राहणार असले, तरी उद्योजक व व्यापाऱ्यांना दर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.

भारत हा खाद्यतेलाचा जगातील आघाडीचा खरेदीदार आहे. देशातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात केलेले असते. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळात भारताने एकूण १ कोटी ३२ लाख ८२ हजार ४२७ टन खाद्यतेल आयात केले होते. 
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सहा महिन्यांत खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने भारतात खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ३५ टक्के वाढ झाली.
गेल्या दोन दिवसांत ८ ते १० रुपये प्रतिलिटर असे दर कमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय चालू आहे... 
भारत सरकारने खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावेत म्हणून तेलांवरील आयात शुल्क ३७.५ वरून २७.५ टक्के म्हणजेच १० टक्के घटविले, मात्र दुसरीकडे मलेशिया या मोठ्या निर्यातदार देशाने खाद्यतेलावर ८ टक्के निर्यात कर लादला. दुसरीकडे इंडोनेशिया या निर्यातदार देशानेही ३ वरून ३३ डाॅलरपर्यंत निर्यात शुल्क वाढविले. त्यामुळे दरांवर परिणाम झाला आहे.

सांगलीतील तेल उद्योजक सुनील ओस्वाल यांनी सांगितले की, सध्या तेलाचे दर थोडे कमी झाले असले, तरी भविष्यात काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तेलाचे व्यापारी गजेंद्र कुल्लोळी यांनी सांगितले की, सध्या दर काहीप्रमाणात घटले आहेत. लोकांनी आता पर्यायी खाद्यतेलांचा वापर सुरू केला आहे. दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Comfort! Edible oil prices fall by Rs 10; Consequences of falling international market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.