Women's Day 2025: भारतीय स्टेट बँकेनं (SBI) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. भारतीय स्टेट बँकेनं (SBI) महिला उद्योजकांना कमी व्याजदरानं विनातारण कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. विशेष महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उत्पादनाला एसबीआयनं 'अस्मिता' अस नाव दिलंय. महिलांना व्यवसाय सुरू करताना पैशांशी संबंधित कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांना कमी व्याजदरानं फायनान्सचा पर्याय उपलब्ध करून देणं हा बँकेच्या या उपक्रमाचा उद्देश आहे.
महिला उद्योजकांना मिळणार सुलभ कर्ज
नवीन ऑफरमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सुलभ कर्ज मिळण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया एसबीआयचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी दिली. तर दुसरीकडे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोन्स यांनी नवीन लाँच हा तांत्रिक नावीन्य आणि सामाजिक समानतेचे प्रतीक असल्याचं सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने 'नारी शक्ती' प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील सादर केलंय, जे विशेषत: महिलांसाठी डिझाइन करण्यात आलंय.
बँक ऑफ बडोदाचीही मोठी घोषणा
एसबीआयसह बँक ऑफ बडोदानंही शुक्रवारी भारतीय वंशाच्या महिलांसाठी 'बॉब ग्लोबल वुमन्स एनआरई आणि एनआरओ सेव्हिंग्ज अकाउंट' सुरू केल्याची घोषणा केली. यामध्ये महिला ग्राहकांना ठेवींवर जास्त व्याज, गृहकर्ज आणि वाहन कर्ज कमी प्रोसेसिंग फीसह तसंच लॉकरच्या भाड्यावर सवलत अशा सुविधा देण्यात येणार आहेत. सुधारित बीओबी प्रीमियम एनआरई आणि एनआरओ बचत खात्यात अनेक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलाय. यात वाढीव व्यवहार मर्यादेसह कस्टमाइज्ड डेबिट कार्ड, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये कॉम्प्लिमेंटरी एन्ट्री, विनामूल्य सुरक्षित ठेव लॉकर आणि विनामूल्य वैयक्तिक आणि हवाई अपघात विमा संरक्षणाचा समावेश असल्याचं बँकेनं म्हटलंय.