India Currency Circulation : आपल्या दैनंदिन जीवनात आपण शेकडो वेळा नोटा आणि नाण्यांचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का, की सध्या भारतात कोणत्या मूल्याची नोट सर्वाधिक लोकप्रिय आहे? अनेकांना वाटेल की १० किंवा २० रुपयांच्या नोटांचा वापर जास्त होतो, पण रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीने सर्वांनाच चकित केले आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत ५०० रुपयांच्या नोटांचे वर्चस्व असून, नाण्यांच्या दुनियेत १ रुपयाचे नाणे 'किंग' ठरले आहे.
नोटांच्या दुनियेत ५०० चा 'रुबाब'
आरबीआयने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण १६,५७,८४७ लाख नोटा चलनात आहेत. यामध्ये संख्यात्मक दृष्टीने ५०० रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक आहे. मध्यमवर्गीयांचा सर्वात विश्वासार्ह साथीदार म्हणून ५०० च्या ६,८३,१३१ लाख नोटा बाजारात फिरत आहेत. ५०० च्या तुलनेत १०० रुपयांच्या २,५०,१६६ लाख, तर १० रुपयांच्या २,७०,२०१ लाख नोटा चलनात आहेत. एकेकाळी चर्चेत असलेली २००० ची नोट आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, केवळ २८० लाख नोटा उरल्या आहेत.
नाण्यांमध्ये १ रुपयाचा 'शिक्का' जोरात!
नाण्यांच्या बाबतीत १० रुपयांचे नाणे लोकप्रिय असेल असा तुमचा अंदाज असेल, तर तो चुकीचा आहे. चलनात सर्वाधिक संख्या १ रुपयाच्या नाण्यांची आहे. बाजारात सध्या १ रुपयाची ५,४८,६१७ लाख नाणी फिरत आहेत. १ रुपयांनंतर २ रुपयांची (३,७३,८८० लाख) आणि ५ रुपयांची (२,२९,७१३ लाख) नाणी सर्वाधिक वापरली जात आहेत. देशातील सर्व नाण्यांचे एकूण बाजार मूल्य ४०,२८७ कोटी रुपये इतके आहे.
चलनी नोटा आणि नाण्यांचा 'डेटा' (एका नजरेत)
नोटांची स्थिती (महत्त्वाची मूल्ये)
| मूल्य (₹) | प्रमाण (लाख नोटा) | एकूण मूल्य (कोटी ₹ |
| ५०० | ६,८३,१३१ | ३४,१५,६५४ |
| १०० | २,५०,१६६ | २,५०,१६६ |
| ५० | १,०६,८४१ | ५३,४२१ |
| १० | २,७०,२०१ | | २७,०२० |
नाण्यांची स्थिती
| मूल्य (₹) | प्रमाण (लाख नाणी) | एकूण मूल्य (कोटी ₹) |
| १ रुपया | ५,४८,६१७ | ५,४८६ |
| २ रुपये | ३,७३,८८० | ७,४७८ |
| ५ रुपये | २,२९,७१३ | ११,४८६ |
| १० रुपये | ९८,९१५ | ९,८९२ |
वाचा - PF मधील छोटी बचत, निवृत्तीचे घालवेल टेन्शन! ५० हजारांच्या पगारावर जमा करा ५.५ कोटींचा फंड
काय सांगते ही आकडेवारी?
डिजिटल पेमेंट आणि युपीआयचा वापर गतीने वाढत असला तरी, भारताच्या अर्थव्यवस्थेत आजही 'कॅश' (नगद) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ५०० रुपयांच्या नोटेचा वाढता वापर हे दर्शवतो की, भाजीपाल्यापासून ते ट्रान्सपोर्टपर्यंत सर्वच स्तरावर ही नोट आता 'स्टँडर्ड' बनली आहे. मोठ्या मूल्याच्या नोटांमध्ये (२०००) झालेली घट आणि ५०० च्या नोटांमधील वाढ ही आरबीआयची सुनियोजित रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
