UPI Payments: भारतात डिजिटल पेमेंटमध्ये यूपीआयनं आपलं वर्चस्व राखलं आहे. यूपीआयनं देवाणघेवाणीचे व्यवहार ४२ टक्क्यांनी वाढलेत तर मोबाइलनं होणारे व्यवहार ८८.५४ अब्जांच्या घरात पोहोचलेत, असे डिजिटल पेमेंट क्षेत्रातील संस्था ‘वर्ल्डलाइन’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आलंय. डिजिटल पेमेंटच्या स्थितीबाबतचा लेखाजोखा मांडला आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या पीओएस टर्मिनलची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाली आहे. स्वीकार, पीओएस टर्मिनलचा विस्तार, मोबाइल व्यवहारांना पसंतीमुळे डिजिटल पेमेंट पर्यावरण अभूतपूर्व गतीनं विकसित होत आहे.
देशातील यूपीआय व्यवहारांची संख्या ९२.२३ अब्जांवर पोहोचली आहे. यात वार्षिक ४२ टक्के वाढ झाली. १३०.१९ ट्रिलियन रुपये इतक्या मूल्यांचे यूपीआय व्यवहार झाले आहेत. या मूल्यात ३१ टक्के वाढ झाली. ६३.३४ कोटी व्यवहार क्यूआर कोडच्या माध्यमातून झालेत. या व्यवहारांचं प्रमाण १२६ टक्के वाढलंय. ८८.५४ अब्जांवर मोबाइलनं होणाऱ्या पेमेंटची संख्या पोहोचली आहे. या व्यवहारांमध्ये वार्षिक ४१ टक्के वाढ झाली आहे.
ग्राहकांच्या पेमेंटच्या पसंतीत मोठा बदल
क्रेडिट कार्ड व्यवहारांत ३६% वाढ झाली आहे तर प्रीपेड कार्डांचा वापर ३५ टक्के वाढला आहे. फास्टॅगद्वारे टोल संकलन १२%वाढले आहे. वर्षभरात १०.३१ कोटी फास्टॅग जारी करण्यात आलेत.
उच्च मूल्याचे सुरक्षित व्यवहार
‘सॉफ्टपीओएस’मुळे पेमेंट्समध्ये क्रांती झाली आहे. यामुळे पारंपरिक पीओएस हार्डवेअरची गरज उरलेली नाही. छोट्या दुकानदारांना पेमेंटसाठी संच घेणे परवडणारं झालं आहे. यात पिन-आधारित उच्च मूल्याचे सुरक्षित पेमेंट करणं शक्य झालंय.
देशभरातील किराणा मालाची दुकाने, रेस्टॉरंट्स, मेडिकल स्टोअर्स तसेच सरकारी सेवा केंद्रामध्ये होणाऱ्या एकूण व्यवहारातील तब्बल ६८ टक्के पीओएसच्या माध्यमातून होत आहेत. या व्यवहारांचे मूल्य एकूण रकमेच्या ५३ टक्के इतके आहे.
ई-कॉमर्स, गेमिंग, वित्तीय सेवा आदींमध्ये ८१ टक्के डिजिटल व्यवहार होतात. यांचं मूल्य एकूण मूल्याच्या ७४ टक्के आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात ही राज्ये डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर आहेत.