UPI in Malaysia: भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाखाली विकसित झालेली डिजिटल पेमेंट प्रणाली, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आता जगभरात आपला ठसा उमटवत आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा एनआयपीएल (NIPL) ने मलेशियामध्ये अधिकृतपणे UPI सेवा सुरू केल्या आहेत. या सोबतच, मलेशिया यूपीआय स्वीकारणारा जगातील नववा देश बनला आहे.
भारतीय पर्यटकांसाठी मोठा दिलासा
या निर्णयामुळे मलेशियात जाणाऱ्या लाखो भारतीय पर्यटकांना खरेदी किंवा सेवांसाठी रोख रक्कम किंवा परकीय चलनावर अवलंबून राहावे लागणार नाही. आता ते आपले Google Pay, PhonePe, Paytm यांसारखे यूपीआय अॅप्स वापरून स्थानिक व्यापाऱ्यांना थेट QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात.
NIPL आणि Razorpay Curlec ची भागीदारी
ही सुविधा शक्य करण्यासाठी NIPL ने मलेशियाच्या प्रमुख पेमेंट गेटवे कंपनी Razorpay Curlec सोबत करार केला आहे. यामुळे पेमेंट प्रक्रिया संपूर्णतः सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना आता मलेशियन रिंगिट खरेदी करणे, किंवा क्रेडिट/डेबिट कार्डचे अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज राहणार नाही.
स्थानिक व्यवसायांनाही फायदा
ही व्यवस्था केवळ भारतीय प्रवाशांसाठीच नव्हे, तर मलेशियातील व्यापाऱ्यांसाठीदेखील फायद्याची ठरणार आहे. यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारणे सोपे झाल्यामुळे भारतीय ग्राहकांचा खर्च वाढेल, व्यवसायाचा उलाढाल वाढेल आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. ही दोन्ही देशांसाठी “विन-विन परिस्थिती” मानली जात आहे.
‘डिजिटल डिप्लोमेसी’चा नवा अध्याय
मलेशियामध्ये यूपीआयची सुरूवात ही भारताच्या डिजिटल डिप्लोमेसी आणि तंत्रज्ञान सामर्थ्याची ठोस झलक आहे. एनआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतेश शुक्ला यांनी सांगितले, आमचे प्रमुख उद्दिष्ट यूपीआयचा जागतिक विस्तार आणि प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी पेमेंट्स अधिक सुलभ करणे आहे.” त्यांनी नमूद केले की, मलेशियासोबतचे हे सहकार्य एक सर्वसमावेशक आणि इंटरऑपरेबल पेमेंट इकोसिस्टम निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
यूपीआयची 9 देशांत उपस्थिती
मलेशियापूर्वी फ्रान्स, संयुक्त अरब अमीरात (UAE), मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, भूतान, नेपाळ आणि कतारमध्ये यूपीआय सेवा सुरू झाल्या आहेत. कतारमध्ये सेवा सुरू होऊन अवघ्या एका महिन्यानंतर मलेशियात लॉन्च झाल्याने भारताच्या डिजिटल पेमेंट विस्ताराच्या गतीचे प्रदर्शन होत आहे. यूपीआयचा हा विस्तार केवळ तांत्रिक यश नाही, तर भारताच्या आर्थिक आणि राजनैतिक प्रभावाचे प्रतीक बनत आहे.
