SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची (Rate Cut) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतर, आता एसबीआयनं देखील आपल्या कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.
बँकेने कर्जाच्या दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठ्या बँकेने सर्व कालावधीसाठीचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ५ बेसिस पॉईंट्सनं कमी केला आहे. या कपातीनंतर MCLR ८.७५% वरून ८.७०% झाला आहे.
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
SBI चं कर्ज झालं स्वस्त
एसबीआयनं बेंचमार्क लिंक्ड रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. हे नवीन दर १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होतील. यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क-लिंक्ड रेट (EBLR) ७.९०% होईल. सध्या बँकेत कर्जाची सुरुवात ८.१५% ने होते, जी १५ डिसेंबरनंतर ८% पेक्षाही कमी होईल.
RBI ने चौथ्यांदा केले व्याजदर कमी
या वर्षी आरबीआयने चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आर्थिक विकासाला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. आरबीआयनं नुकतीच दरकपात केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे दर कमी करण्यास सुरुवात केली आहे आणि एसबीआयचे ग्राहक देखील या कपातीची वाट पाहत होते.
SBI च्या FD दरांमध्येही बदल
व्याजदरांमध्ये कपात केल्यानंतर, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने मुदत ठेवीच्या (Fixed Deposit) व्याजदरातही बदल केला आहे. २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर ६.४०% झाले आहेत. याशिवाय, ४४४ दिवसांच्या (अमृत वृष्टी) योजनेचे व्याजदर ६.६०% वरून कमी होऊन ६.४५% झाले आहेत. इतर मॅच्युरिटी असलेल्या एफडीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
कोणाला होणार फायदा?
या दर कपातीचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. जसं की, पर्सनल लोन, वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता कमी व्याज भरावं लागेल. म्हणजेच, आता कर्जाचा ईएमआय (EMI) कमी होईल.
उदाहरणासह समजून घ्या
जर तुम्ही एसबीआयमधून २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतलं असेल किंवा घेण्याची योजना करत असाल, तर आता तुम्हाला ईएमआयमध्ये कमी व्याज द्यावं लागेल. पूर्वी व्याजदर ८.१५% होता, तो आता कमी होऊन ७.९०% च्या आसपास झाला आहे. याचा अर्थ, आता तुमच्या मासिक ईएमआयमध्ये ७५० रुपयांहून अधिक कपात होईल. संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास तुमचे सुमारे ९००० रुपये वाचतील. २० वर्षांच्या दीर्घ मुदतीत तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत.
