देशातील कोट्यवधी खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, भारतातील बँकांमध्ये दावा न केलेली (Unclaimed Deposits) रक्कम 2024 अखेरपर्यंत ₹62,314 कोटींवर पोहोचली आहे. ही रक्कम अशा बँक खात्यांमध्ये पडून आहे, ज्यामध्ये गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. विशेष म्हणजे, ही रक्कम अजूनही संबंधित खातेदारांचीच आहे आणि ती परत मिळवता येऊ शकते.
सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक अनक्लेम्ड रक्कम
RBI च्या वार्षिक अहवालानुसार, एकूण अनक्लेम्ड रकमेपैकी सुमारे ₹50,900 कोटी रुपये केवळ सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांमध्ये जमा आहेत. यावरून मोठ्या प्रमाणात लोकांनी जुनी खाती विसरल्याचे चित्र स्पष्ट होते.
SBI कडे सर्वाधिक अनक्लेम्ड डिपॉझिट
या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अव्वल स्थानी आहे. SBI कडे एकट्याच ₹16,968 कोटींची अनक्लेम्ड रक्कम आहे. यानंतर इतर मोठ्या सरकारी बँकांचा क्रमांक लागतो. आकडेवारी पाहिली तर, 2021 मध्ये अनक्लेम्ड डिपॉझिट सुमारे ₹31,000 कोटी होते, तर अवघ्या तीन वर्षांत ही रक्कम दुपटीहून अधिक झाली आहे.
अनक्लेम्ड पैसा कसा मिळवायचा?
जर तुमच्या किंवा कुटुंबातील कोणाच्या नावावर जुने किंवा निष्क्रिय बँक खाते असेल, तर पैसा मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे.
कोण दावा करू शकतो?
खातेदार, संयुक्त खातेदार , नामनिर्देशित व्यक्ती आणि कायदेशीर वारस.
काय करावे लागेल?
संबंधित बँकेच्या शाखेत भेट द्यावी, आवश्यक KYC कागदपत्रे सादर करावी, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन खाते पुन्हा सुरू करावे किंवा खाते बंद करून रक्कम हवी असल्यास, बँक दावा प्रक्रिया करून पैसे परत करते.
‘आपला पैसा, आपला अधिकार’ जनजागृती मोहीम
लोकांना त्यांच्या विसरलेल्या पैशांची माहिती मिळावी, यासाठी सरकारने ‘आपला पैसा, आपला अधिकार’ ही विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांनी जुनी किंवा निष्क्रिय बँक खाती तपासून स्वतःचा हक्काचा पैसा परत मिळवावा हा आहे.
10 वर्षांनंतर पैसा कुठे जातो?
RBI च्या नियमानुसार, जर एखाद्या खात्यात 10 वर्षे कोणताही व्यवहार झाला नाही, तर ती रक्कम RBI च्या ‘Depositor Education and Awareness (DEA) Fund’ मध्ये वर्ग केली जाते. मात्र, पैसा DEA फंडात गेला तरी खातेदार किंवा त्याच्या वारसांचा त्या रकमेवर पूर्ण अधिकार कायम राहतो आणि दावा करता येतो.
