रिझर्व्ह बँकेनं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) एक्स १० फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) एक्स १० फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची नोंदणी रद्द केली आहे. व्हीकॅश टेक्नॉलॉजी, एक्सएनपी टेक्नॉलॉजी, यारलुंग टेक्नॉलॉजी, शिनरुई इंटरनॅशनल, मॅड-एलिफंट नेटवर्क टेक्नॉलॉजी, हायडाटेक टेक्नॉलॉजी अशा विविध सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या (Mobile Apps) माध्यमातून मुंबईची ही कंपनी कर्ज पुरवठा करत होती.
रिझर्व्ह बँकेनं काय म्हटलं?
कंपनीनं आपल्या डिजिटल लोन ऑपरेशनमध्ये आउटसोर्सिंग वित्तीय सेवांमध्ये आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केल्यामुळे नोंदणी प्रमाणपत्र (COR) रद्द करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली. क्रेडिट असेसमेंट, व्याजदर निश्चिती तसंच केवायसी व्हेरिफिकेशन यासारखी महत्त्वाची कामं कंपनीनं सर्व्हिस प्रोव्हायडरकडे आउटसोर्स केली. यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर चौकशी करण्यात अपयशी ठरल्याचंही त्यांनी म्हटलं.
एक्स १० फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड पूर्वी अभिषेक सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. जून २०१५ मध्ये कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.
समिती मूल्यमापन करणार
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) सार्वत्रिक आणि लघु वित्त बँकांच्या अर्जांचं मूल्यांकन करण्यासाठी स्थायी बाह्य सल्लागार समितीची (SESC) पुनर्रचना केली आहे. पाच सदस्यीय समितीचे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एम.के. जैन असतील. अर्जदारांची प्रथमदर्शनी पात्रता सुनिश्चित करण्यासाठी परवाना मार्गदर्शक तत्त्वांनुसार सार्वत्रिक आणि लघु वित्त बँकांसाठीच्या अर्जांची प्राथमिक छाननी आरबीआयद्वारे केली जाते.
समितीच्या इतर सदस्यांमध्ये रेवती अय्यर (संचालक, सेंट्रल बोर्ड, आरबीआय); पार्वती व्ही सुंदरम (माजी कार्यकारी संचालक, आरबीआय), हेमंत जी कॉन्ट्रॅक्टर (माजी व्यवस्थापकीय संचालक, एसबीआय आणि माजी अध्यक्ष पीएफआरडीए); आणि एन एस कन्नन (माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी) यांचा समावेश असेल.